नोकरीवरून काढल्याचा राग; एकाच वेळी 15 गाड्यांवर फेकले अॅसिड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 23:21 IST2023-03-17T23:21:04+5:302023-03-17T23:21:15+5:30
याप्रकरणी सोसायटीतील रहिवाशांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नोकरीवरून काढल्याचा राग; एकाच वेळी 15 गाड्यांवर फेकले अॅसिड
नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. नोएडामधील सेक्टर-75 येथील मॅक्सब्लिस व्हाईट हाऊस सोसायटीमध्ये एका तरुणाने 15 जणांच्या गाड्यांवर अॅसिड फेकले, त्यामुळे त्या गाड्यांचे पेंट आणि काचांचे नुकसान झाले. या गाड्यांवर अॅसिड फेकण्याचे कारण म्हणजे तरुणाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. दरम्यान, या तरुणाने गाड्यांवर अॅसिड फेकल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हरदोई रामराज असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सोसायटीतील रहिवाशांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रहिवाशांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. हे प्रकरण कोतवाली-सेक्टर-113 चे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोसायटीत गाड्या साफ करत होता. त्याच्या कामाच्या पद्धतीवर सोसायटीमधील लोक नाराज होते, त्यामुळे काही दिवसांपूर्वी सोसायटीने त्याला कामावरून काढून टाकले. त्यानंतर संतप्त झालेल्या आरोपींने सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर अॅसिड फेकले. त्यात जवळपास डझनभर गाड्यांचे नुकसान झाले.
घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता, मात्र सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीतील रहिवासी रोशन राय, रिप्ची, संदीप शर्मा, प्रदीप सिंह नेगी, यश शर्मा, आकाश सेगर, शुभम शर्मा, वंश झा, शिवी वर्मा, शशांक द्विवेदी, रमेश चंद्र पांडे, मदन गौतम, आलोक कुमार आदींनी पोलिसांत तक्रार दिली आहे. तपासादरम्यान, गाड्यांवर अॅसिड फेकल्याची घटना सोसायटीत गाड्या साफ करणाऱ्या तरुणाने केल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला तुरुंगात पाठवले.