रात्रीच्या वेळी आईस्क्रीम न मिळाल्याच्या रागात अज्ञाताने फोडला फ्रीज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 10:37 PM2021-12-23T22:37:13+5:302021-12-23T22:38:36+5:30
Crime News : वसईतील कौल हेरिटेज सिटीमधील घटना ; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
आशिष राणे
गारेगार गुलाबी थंडीच्या लाटेत चक्क थंडगार आईस्क्रीम खायची लहर आलेल्या अज्ञात इसमाने मेडिकल शॉप मध्ये आईस्क्रीम असून देखील ते न मिळाल्याच्या रागात चक्क आईस्क्रीम फ्रीजलाच लक्ष करीत तो फोडल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामुळे उघडकीस आली आहे.
वसईतील उच्चभ्रू कौल हेरिटेज सिटीतील दोषी- अगरवाल संकुलातील मे. वेलनेस मेडिकल शॉपच्या आवारात रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली असून तोडफोड करणाऱ्या अज्ञात इसमाने मात्र फ्रिजची तोडफोड केल्यानंतर तेथून पोबारा केला आहे
या घडल्या प्रकाराची तक्रार मे.वेलनेस मेडिकल शॉपच्या कर्मचाऱ्यांनी माणिकपूर पोलिसांत केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केल्याचे माणिकपूर पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी लोकमत ला सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री २ च्या सुमारास कौल सिटी मधील दोषी अगरवाल संकुलात असलेल्या मे वेलनेस मेडिकल हे रात्र- दिवस उघडे असते त्यातच रात्रीच्या वेळी एक अज्ञात इसम मेडिकल शॉप मध्ये आल्यावर त्याने कुठल्याही प्रकारचे औषध- गोळी न मागता थेट शॉप बाहेर असलेल्या फ्रीज मधील आईस्क्रीमची मागणी केली मात्र फार्मासिस्टने आपल्याला केवळ औषधेच मिळतील तर नियमानुसार आम्हाला यावेळी आईस्क्रीम विक्री करता येणार नाही असे सांगताच त्या इसमाने रागाच्या भरात शॉप बाहेरील त्या आईस्क्रीम फ्रीजची सॅनिटाईजर स्टँडच्या सहाय्याने तोडफोड केली व तेथून निघून गेला.
दरम्यान घडला सर्व प्रकार हा शॉप च्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून माणिकपूर पोलिस आता या तोडफोड करण्याऱ्या इसमाचा शोध घेत आहेत तर माणिकपूर पोलिसांनी या इसमास शोधून काढल्यावरच त्या इसमाची खरी माहिती मिळेल.