हुंड्यामध्ये बाईक न मिळाल्याने संतप्त पतीने पत्नीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:09 PM2020-06-02T15:09:23+5:302020-06-02T15:10:02+5:30
विविध नंबरवरुन कॉल येऊ लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली
आजमगड – उत्तर प्रदेशातील आजमगड येथे महिलांच्या विरोधातील गुन्हे थांबवण्याची चिन्हे नाहीत. अलीकडेच कोतवाली पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. याठिकाणी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा नंबर सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याखाली अश्लिल कमेंट केली. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपी पतीला अटक केली आहे.
सोशल मीडियावर पत्नीच्या मोबाईल नंबरसह तिचा फोटो लावून तिची अब्रू विकण्याचा धक्कादायक प्रकार पतीने केला. पीडित महिलेने या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपी पतीला अटक करुन जेलची हवा खायला पाठवलं आहे. आजमगड येथील कोतवाली परिसरात असणाऱ्या गावातील ही घटना आहे.
पीडित पत्नीचे ठुठिया गावातील रहिवासी पुनीतसोबत २ वर्षापूर्वी लग्न झालं होतं. लग्नाचा हुंडा म्हणून पतीला बाईक न मिळाल्याने तो नाराज होता. या कारणामुळे पती-पत्नी यांच्यात जोरदार भांडण होत असे, पती पीडित पत्नीला वारंवार मारहाण करत होता. पतीच्या जाचाला कंटाळून अखेर पत्नीने त्याला सोडून माहेरी गेली. यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अश्लिल संवाद साधण्यासाठी या नंबरवर फोन करा असं सांगत त्याने पत्नीचा मोबाईल नंबर टाकला. त्यासोबतच पत्नीच्या अब्रूची किंमतदेखील पतीने लावली.
विविध नंबरवरुन कॉल येऊ लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागलेल्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. ज्यानंतर सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. याबाबत पोलीस अधिक्षक त्रिवेणी सिंह म्हणाले की, अटक केलेल्या आरोपीने हुंड्यात बाईक न मिळाल्याने पत्नीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याचसोबत मोबाईल नंबर सार्वजनिक करुन अश्लिल बाता करण्यासाठी ऑफर दिली. तिच्या अब्रूची किंमतही लावली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन तात्काळ आरोपी पतीला अटक करुन त्याला जेलमध्ये टाकलं.