६० लाखांची खंडणी, अपहरणाचा बनाव, १० दिवसांनी उलगडा; पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:09 IST2025-03-22T17:55:48+5:302025-03-22T18:09:20+5:30
पोलिसांनी संशयित प्रणय पद्मणे आणि शुभम इंगळे यांची कसून चौकशी केली. अखेर २१ मार्च रोजी प्रणयने गुन्ह्याची कबुली दिली

६० लाखांची खंडणी, अपहरणाचा बनाव, १० दिवसांनी उलगडा; पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला
वाशिम - अपहरणाचा बनाव करत गावातीलच दोन तरूणांनी जुन्या वादातून १४ वर्षीय अनिकेत सादुडे या निरागस मुलाची गळा दाबून निर्घृण हत्या केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी अनिकेतचा मृतदेह पुरून ठेवण्यासह पोलीस तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला. अखेर २१ मार्च रोजी या घटनेचा उलघडा झाला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
बाभूळगाव येथील अनिकेत सादुडे हा गावातील नानमुखाच्या कार्यक्रमात रात्री वरातीच्या मिरवणुकीत डी.जे तालावर थिरकत असताना अचानक बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी १३ मार्चच्या पहाटे अनिकेतच्या घरासमोर बंद लिफाफ्यात पाच पानांची चिठ्ठी ठेवण्यात आली. या चिठ्ठीत ६० लाख रूपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली. खंडणी न दिल्यास अनिकेतला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी १८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले.
पोलिसांनी संशयित प्रणय पद्मणे आणि शुभम इंगळे यांची कसून चौकशी केली. अखेर २१ मार्च रोजी प्रणयने गुन्ह्याची कबुली दिली. अनिकेतचा मृतदेह पुरून ठेवलेले ठिकाण पोलिसांना दाखवले. १० दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. प्रणय पद्मणे हा या घटनेतील मास्टर माईंड असून त्याचे त्याचा मित्र शुभम इंगळेच्या सहाय्याने अनिकेतला आमिष दाखवून वरातीतून बाहेर काढले. बाभूळगाव फाटा शेतशिवारात नेऊन त्याचा गळा दाबला. केलेले कृत्य उघड होऊ नये आणि पोलिसांचे लक्ष विचलित व्हावे यासाठी अपहरणाचा बनाव करत प्रणयने ६० लाखांच्या खंडणी मागणीचा पत्रप्रपंच केल्याचं पोलीस तपासात उघड झाले.
आई वडिलांचा आक्रोश असह्य करणारा..
अनिकेतची गळा दाबून हत्या करून त्याचा मृतदेह पुरून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच अनिकेतच्या आई वडिलांनी मोठा आक्रोश केला. अनिकेत हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो अभ्यासात अत्यंत हुशार असण्यासह सुसंस्कृतदेखील होता. गावातीलच दोघांनी त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. प्रणय पद्मणे आणि शुभम इंगळे यांनी अनिकेतची हत्या जुन्या वादातून केल्याचे कबुल केले. परंतु हा वाद नेमका कोणता हे अद्याप पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं नाही.
४५ मिनिटातच आरोपींनी अनिकेतला संपवलं
१२ मार्च रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास अनिकेत सादुडे यास प्रणय पद्मणे आणि शुभम इंगळे या दोघांनी वरातीच्या मिरवणुकीतून पळवून नेले. तसेच १२.४५ वाजता अनिकेतचा गळा दाबून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. अवघ्या ४५ मिनिटातच आरोपींनी हे गंभीर कृत्य केले.