Anil Deshmukh, Sachin Vaze: अनिल देशमुख ईडीकडे, सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 06:51 AM2021-11-02T06:51:29+5:302021-11-02T06:51:43+5:30
बांधकाम व्यावसायिकाकडून हप्तेवसुलीचे प्रकरण. गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टॉरंट बार आणि बीसीबी रेस्टॉरंट ॲण्ड बार आहे. सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावमधील एका वसुलीप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला सोमवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात वाझेला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह ऊर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह ऊर्फ बबलू आणि रियाझ भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे आणि व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) अटक केलेल्या वाझे याचा ताबा मिळवण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून वाझे याचा ताबा घेतला.
काय आहे प्रकरण?
गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टॉरंट बार आणि बीसीबी रेस्टॉरंट ॲण्ड बार आहे. सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता.
मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्यानंतर वाझे याने अग्रवाल यांना वसुलीसाठी त्रास देण्यास सुरुवात केली.
त्याने साथीदारांच्या मदतीने जानेवारी २०२० ते मार्च २०२१ मध्ये अग्रवाल यांच्याकडून
९ लाख रुपये आणि २ लाख ९१ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल हप्ता म्हणून घेतले, असे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.