अनिल देशमुखांना ईडीने धाडले पुन्हा समन्स; मंगळवारी हजर राहण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 09:08 PM2021-06-26T21:08:50+5:302021-06-26T21:24:37+5:30
Anil Deshmukh summoned again by ED : मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु देशमुख ईडी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत आणि वकिलांमार्फत कोणत्याही दुसऱ्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ मागितला. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात केलेल्या आरोपाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यानंतर ईडीने आता पुन्हा देशमुखांना समन्स पाठवले आहे. मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ईडीने आज बोलावले होते. मात्र, वैद्यकीय कारण देत आज अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांना समन्स जारी केले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर रहावे असे समन्समध्ये सांगण्यात आले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप केला. याप्रकरणी बार मालकांनी दिलेला जबाब तसेच सचिन वाझे याच्या जबाबानंतर ईडीने अनिल देशमुखांच्या निकटवर्थींना अटक केली आहे. अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. दोघांनाही 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईडीच्या चौकशीसंदर्भात देशमुख यांचे वकील जयवंत पाटील म्हणाले की, “आम्ही ईडीला अर्ज करून चौकशीची अंमलबजावणी कोणत्या आधारे केली जात आहे, याची कागदपत्रे मागितली आहेत.'' आमच्याकडे तपासणीच्या संदर्भात कोणतीही माहिती नाही. म्हणून आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता ईडीला यावर निर्णय घ्यावा लागेल. यापूर्वी, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांना समन्स बजावून शनिवारी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या नेत्याला बॅलार्ड इस्टेट भागातील ईडी कार्यालयात या प्रकरणातील चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) समन्स बजावण्यात आले होते आणि देशमुख यांना हजर होण्यास सकाळी 11 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी दुसरी वेळ मागितल्यानुसार ईडीने पुन्हा समन्स बजावून मंगळवारी चौकशीला बोलाविले आहे.