Anil Deshmukh: सीबीआय अधिकाऱ्यांजवळच्या 'त्या' बॅगेमध्ये काय होतं?; अनिल देशमुखांच्या घरी नाट्यमय घडामोड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 09:16 PM2021-04-24T21:16:16+5:302021-04-24T21:18:51+5:30
अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत आत मध्ये टेस्ट करण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. काही मिनिटातच निरोप घेऊन गेलेला पोलीस अधिकारी बाहेर आला. त्याने आता टेस्ट होणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे ते त्यांच्या पथकासह निघून गेले.
नरेश डोंगरे
नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआय कारवाईची शनिवारी सकाळी झालेली सुरुवात अनपेक्षीत अन् नाट्यमय होती. तर, कारवाई संपल्यानंतर अर्ध्या तासांनी पुन्हा नाट्यमय घडामोड घडली. पहिल्या टप्प्यातील कारवाईचे स्वरूप गुलदस्त्यात होते अन् दुसऱ्या टप्प्यातील कारवाईदेखिल वृत्त लिहिस्तोवर तशीच गुलदस्त्यात राहिली.
देशमुख नेहमीप्रमाणे शनिवारी मॉर्निंग वॉक करून घरी परतले. ते निवासस्थानाच्या दारावर येताच दोन मोठ्या वाहनात बसून असलेले सीबीआयचे दहा जणांचे पथक भरभर त्यांच्याजवळ पोहचले. सर्वच्या सर्व पीपीई किट घालून होते. आज देशमुखांच्या निवास्थानी काही जणांची अँटीजेन टेस्ट करण्यासाठी वैद्यकीय पथक येणार होते. त्यामुळे पीपीइ किटमधील वैद्यकीय पथक असावे, असे देशमुखांना वाटले. मात्र दुसऱ्याच क्षणी एका अधिकाऱ्याने समोर होऊन आम्ही सीबीआयचे अधिकारी आहोत, असे सांगून आपल्या निवासस्थानी आम्ही चौकशी करण्यासाठी आल्याची माहिती दिली. यावेळी देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबातील पाच ते सात सदस्य, घरातील नोकर आणि एक स्वीय सहाय्यक तसेच टेलिफोन ऑपरेटर एवढी मंडळी होती. त्या सर्वांना सीबीआयच्या पथकाने हॉलमध्ये बसविले आणि चौकशी सुरू केली. दरम्यान, ठरल्याप्रमाणे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अँन्टीजेन टेस्ट करण्यासाठी एक वैद्यकीय पथक देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि प्रसार माध्यमांची मंडळी उभी होती. वैद्यकीय पथकातील अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मार्फत आत मध्ये टेस्ट करण्यासाठी आल्याचा निरोप पाठवला. काही मिनिटातच निरोप घेऊन गेलेला पोलीस अधिकारी बाहेर आला. त्याने आता टेस्ट होणार नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले त्यामुळे ते त्यांच्या पथकासह निघून गेले.
नेमके काय कळेना! अनिल देशमुखांच्या घरी पीपीई किट्स घातलेले CBI चे ‘ते’ अधिकारी कोण आणि कुठले?
वेगवेगळ्या तपास यंत्रणा बंगल्यासमोर
देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने छापा घातल्याची माहिती वायुवेगाने सर्वत्र पोहोचली. त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या अखत्यारीत असलेली सेंट्रल इंटेलिजन्स ब्युरो, स्टेट एसआयडी आणि सीआयडी आदी तपास यंत्रणांचे अधिकारी देशमुख यांच्या बंगल्यासमोर पोहोचले. स्थानिक पोलिसांचाही मोठा ताफा सकाळपासूनच येथे होता. प्रत्येक जण आपापल्या परीने कारवाईचे स्वरूप जाणून घेण्याचा दिवसभर प्रयत्न करीत होते. मात्र, तब्बल १० तासांपर्यंत त्यांना चाैकशीत नेमके काय झाले, त्याचा थांगपत्ता लागला नाही.
एक पथक पुन्हा परतले , देशमुखांनाही बोलवून घेतले
६.३० ला सीबीआयचे पथक निघून गेले. त्यांनी नेमकी काय कारवाई केली, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, आजची कारवाई संपली, असा अनेकांनी अंदाज काढला. मात्र, अर्ध्या तासातच पुन्हा दोन वाहनांपैकी एका वाहनातील अधिकारी देशमुख यांच्या निवासस्थानी पोहचले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी रस्त्यातूनच संपर्क करून देशमुख यांना बोलवून घेतले. सीबीआयच्या दोन पैकी एकच पथक पुन्हा परतल्याने त्यांनी कोणती चाैकशी सुरू केली. आधीच्या चाैकशीत काय बाकी राहिले होते, उर्वरित अधिकारी कुठे थांबले, असे प्रश्न उपस्थित झाले होते. या नाट्यमय घडामोडीमुळे पुन्हा नव्याने तर्कवितर्क वर्तविले जाऊ लागले.
सीबीआय अधिकाऱ्यांजवळच्या त्या बॅगांमध्ये काय होतं?
पीपीई किट घालून देशमुखांच्या निवासस्थानी आलेल्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कॉलेज स्टूडेन्स् सारख्या काळ्या बॅग अडकवल्या होत्या. त्या बॅगमध्ये नेमके काय होते, असा प्रश्न चर्चेला आला आहे. दुसरे म्हणजे, दुपारच्या वेळी सीबीआयचा एक अधिकारी बाहेर आला आणि त्याने आधी एका वाहनाची पाहणी केली आणि नंतर दुसऱ्या वाहनातून पांढऱ्या कापडात बांधलेला गठ्ठा आतमध्ये नेला. फाईल अथवा कागदपत्रांसारखा तो गठ्ठा दिसत होता. चाैकशीनंतर तो गठ्ठा तसेच ते बाहेर घेऊन आले. या गठ्ठयात काय होते आणि तो कशासाठी सीबीआय अधिकाऱ्यांनी आत नेला, या प्रश्नानेही चर्चेचे मोहोळ उडवले आहे.