Anil Deshmukh: अनिल देशमुखांची दिवाळी कोठडीतच; ६ नोव्हेंबरपर्यंत मुक्काम तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:20 AM2021-11-03T07:20:31+5:302021-11-03T07:20:56+5:30
मंगळवारी सकाळी देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची दिवाळी तुरुंगात जाणार आहे. ईडीची १४ दिवसांची कोठडीची मागणी विशेष सत्र न्यायालयाने फेटाळली.
देशमुख यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याबाबत सीबीआयच्या प्राथमिक अहवालानुसार दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला. साेमवारी १३ तासांच्या चौकशीनंतर मध्यरात्री त्यांना अटक केली.
मंगळवारी सकाळी देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले. ‘ईडी’तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले की, वसुली रॅकेटमधील व्यवहार गंभीर आहेत. त्यात देशमुख यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्या १४ दिवसांच्या कोठडी देण्यात यावी.
ईडीकडे देशमुख यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नाहीत. सीबीआयच्या अहवालाच्या आधारे बेकायदेशीरपणे त्यांना अटक केली आहे. ७२ वर्षांचे देशमुख आजारांनी ग्रस्त असल्याने कोठडी देणे अप्रस्तुत असल्याचा दावा देशमुख यांच्या वतीने करण्यात आला.