अनिल परबांच्या अडचणी वाढणार?; आरटीओ विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी तक्रारदाराची दिवसभर झाली चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 06:52 PM2021-05-31T18:52:33+5:302021-05-31T19:00:38+5:30
Corruption in RTO Department : उद्या पुन्हा पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
नाशिक : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) मागील दोन वर्षांपासून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नाशिक पोलिसांकडे प्राप्त झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेेत चौकशीचे आदेश दिले आहे. यानुसार गेल्या तीन दिवसांपासून विविध शासकीय अधिकाऱ्यांपासून खासगी व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. सोमवारी (दि.३१) तक्रारदार निलंबित मोटार निरिक्षक गजेंद्र तानाजी पाटील यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. संपुर्ण दिवसभर आयुक्तालयाच्या वास्तुमधील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. यामुळे आयुक्तालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पाटील यांच्या चौकशीमधून काही बाबी समोर आल्या असून अंशत: चौकशी सोमवारी पुर्ण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सांगत यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून तर थेट राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यापर्यंत विविध अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग आहे, असे गंभीर स्वरुपाचे आरोप याच खात्यातील एका निलंबित मोटर निरिक्षकांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केले आहे. यामुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नाशिकमधील पंचवटी पोलिसांकडे तक्रार अर्ज आल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी स्वत: याकडे लक्ष घालून गुन्हे शाखेच्या उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश दिले आहे. आतापर्यंत ढाकणे यांच्यासह आठ शासकीय अधिकाऱ्यांचे जबाब या प्रकरणात पोलिसांनी नोंदविले आहे. सोमवारी पाटील यांची चौकशी करत जबाब नोंदविण्यात आले. मात्र ही चौकशी अर्धवट असून मंगळवारी पुन्हा पाटील यांना चौकशीकरिता बोलविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकुणच या आरटीओ प्रकरणातील भ्रष्टाचारामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह विविध शासकिय अधिकाऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे.