अंजली, निधीसोबत स्कुटीवर एक तरुणही, कंझावला घटनेत मैत्रिणीची पोलिसांकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 08:36 AM2023-01-07T08:36:16+5:302023-01-07T08:36:34+5:30
रविवारी रात्री कंझावला येथील अंजली सिंग (वय २०) हिच्या स्कुटीला एका कारने धडक देऊन तिला सुलतानपुरी ते कंझावलापर्यंत १२ किलोमीटर फरफटत नेले.
नवी दिल्ली : कारने फरफटत नेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीसोबत स्कुटीवर असलेल्या तिच्या मैत्रिणीची पोलिस चौकशी करीत आहेत. या प्रकरणात आणखी एक फुटेज समोर आले आहे. एका व्हिडीओमध्ये एक तरुण स्कुटी चालवत असून, मागे अंजली आणि तिची मैत्रीण निधी बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.
रविवारी रात्री कंझावला येथील अंजली सिंग (वय २०) हिच्या स्कुटीला एका कारने धडक देऊन तिला सुलतानपुरी ते कंझावलापर्यंत १२ किलोमीटर फरफटत नेले. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासल्यानंतर अंजलीसोबत
स्कुटीवर आणखी एक तरुणी
(निधी) असल्याचे समोर आले
होते.
मंगळवारी निधीने पोलिसांसमोर जबाब नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणातील आणखी एक आरोपी आशुतोषला अटक केली आहे.
दीपक खन्ना (२६), अमित खन्ना (२५), कृष्णा (२७), मिथुन (२६) व मनोज मित्तल हे अपघाताच्या वेळी कारमधून प्रवास करीत होते, त्यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली
आहे.
आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आशुतोषवर आहे. याच आरोपावरून पोलिस आरोपी अमित खन्नाचा भाऊ अंकुश खन्ना याचाही शोध घेत आहेत.
घटनेच्या वेळी कारमध्ये चौघेच होते
दिल्लीतील कंंझावला दुर्घटनेबाबत नवनवी माहिती प्रकाशात येत आहे. कार अंजलीला फरफटत घेऊन जात असताना कारमध्ये पाचजण होते, असे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. मात्र, तेव्हा कारमध्ये चारजणच होते, असे आता समोर आले आहे. दीपक नावाचा आरोपी घटनेवेळी घरी होता. मात्र, त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असल्याने आरोपींनी त्याला गुन्हा स्वत:वर घेण्यास भाग पाडल्याचे तपासांत समोर आले आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स नसताना चालवली कार
घटनेच्या वेळी अमित कार चालवीत होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नाही. अंजलीच्या स्कुटीला धडक देऊन तिला फरफटत नेल्यानंतर तो त्याचा मित्र दीपककडे गेला व त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्याच्याकडे लायसन्स नाही हे कळल्यावर दीपकने गाडी चालविण्याची जबाबदारी स्वत:वर
घेतली.
आणखी तीन व्हिडीओ समोर
३१ डिसेंबरच्या रात्रीचे आणखी तीन व्हिडिओ गेल्या २४ तासांत समोर आले आहेत. पोलिसांना घटनेच्या मार्गाचे २३ व्हिडिओ मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याआधारे आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.