अंकिता भंडारी हत्या प्रकरणात नवा खुलासा; "भाजपा आमदाराच्या सांगण्यावरूनच..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 09:18 AM2023-12-25T09:18:57+5:302023-12-25T09:19:15+5:30
जर अंकिताच्या हत्येनंतर रिसोर्टवर घटनास्थळ संरक्षित केले गेले असते तर अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले असते.
नवी दिल्ली - Ankita Bhandari Murder Case ( Marathi News ) उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणी सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत साक्षीदार आणि बुलडोझर चालक दीपकनं कोर्टात त्याचा जबाब नोंदवला आहे. तत्कालीन उपजिल्हाधिकारी आणि भाजपा आमदाराच्या सांगण्यावरूनच हत्याकांडातील आरोपी पुलकित आर्याच्या वनंत्रा रिसोर्टवर जेसीबी चालवला होता असं त्याने कोर्टात सांगितले.
ऋषिकेशच्या श्यामपूर इथं राहणाऱ्या दीपकनं शुक्रवारी कोर्टात जबाब दिला. त्यात दीपक म्हणाला की, मी तत्कालीन उपजिल्हाधिकारी आणि सध्या विद्यमान आमदार रेनू बिष्ट यांच्या सांगण्यावरून जेसीबीनं रिसोर्टचे गेट, भिंती आणि खिडक्या आणि खोल्या तोडल्या. सत्येंद्र सिंह रावत यांचा जेसीबी मी चालवत होतो. त्यांनी सांगितल्यानंतर मी २३ सप्टेंबर २०२२ रोजी जेसीबी घेऊन वनंत्रा रिसोर्टवर पोहचलो.अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार मी रिसोर्टचा गेट आणि सुरक्षा भिंत तोडून तिथून हरिद्वारसाठी रवाना झालो. पण तिथं आमदार रेनू बिष्ट यांच्या खासगी सहाय्यकाने फोन करून पुन्हा जेसीबी घेऊन रिसोर्टवर पोहचण्यास सांगितले.
तो जेसीबी घेऊन पुन्हा रिसोर्टवर पोहचला तिथे आमदारही होते. त्यांनी सांगितल्यानंतर मी २ खोल्या आणि खिडक्या तोडल्या. या कामानंतर त्या रात्री मला आमदाराने त्याच रिसोर्टवर मुक्काम करायला सांगितला. दीपकशिवाय अन्य २ साक्षीदार पोलिसांनी या प्रकरणी कोर्टासमोर हजर केले. त्यात २ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून स्थानिक भाजपा आमदार पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोप होत होता. मात्र सातत्याने आमदाराकडून त्यास नकार दिला जात होता. जर अंकिताच्या हत्येनंतर रिसोर्टवर घटनास्थळ संरक्षित केले गेले असते तर अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले असते. आता जेसीबी चालकाच्या साक्षीनंतर रिसोर्टवर आमदारांच्या सांगण्यावरून जेसीबी चालवण्यात आला हे स्पष्ट झाले आहे.
काय आहे प्रकरण?
१९ वर्षीय अंकिता भंडारी ऋषिकेशच्या पौडी जिल्ह्यातील वनंत्रा रिसोर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कथितपणे रिसोर्ट संचालक पुलकित आर्याने त्याच्या २ सहकाऱ्यासोबत मिळून तिला नाल्यात ढकलून अंकिताची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली. पुलकितचे वडील विनोद आर्य हे भाजपात होते. परंतु या घटनेनंतर भाजपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.