संतापजनक! चिनावल-सावदा परिसरात समाजकंटकांनी कापली केळीची बाग, ठिबक सिंचन साहित्य जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 11:28 AM2022-02-27T11:28:06+5:302022-02-27T11:29:10+5:30
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत.
जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत. रविवारी सकाळी देखील अशाच दोन घटना उघडकीस आल्या. चिनावल येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील ठिबक सिंचन साहित्य जाळून टाकलं तर दुसऱ्या एका घटनेत केळीची बाग कापून टाकली आहे. या दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिनावल येथील शेतकरी प्रमोद भंगाळे यांच्या शेतातील 10 हजार केळी खोडांचे ठिबक सिंचन साहित्य समाजकंटकांनी जाळून टाकलंय. हे ठिबक सिंचन साहित्य भंगाळे यांनी गोळा करून शेताच्या बांधावर ठेवलं होतं. या घटनेत त्यांचं सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झालंय. दुसऱ्या एका शेतकऱ्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्याच्या शेतातील केळीची बाग कापून टाकली आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
संतप्त शेतकऱ्यांचा सावद्यात रास्तारोको
या दोन्ही घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासनाने अशी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सावदा शहरातील मुख्य चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी महामार्गावर दोन्ही बाजूला ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक रोखून धरली होती.
आमदार शिरीष चौधरींचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही सहभाग नोंदवला. शेतीचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी, अशी मागणी करत त्यांनीदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत शांतता राखण्याचे आवाहन केलं.