संतापजनक! हातपाय बांधून बापानं तळपत्या उन्हात सोडलं, मुलाचा तडफडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:55 PM2022-06-14T13:55:57+5:302022-06-14T15:31:52+5:30
Death Case : पत्नी आणि आईला मारहाण करून मयत मुलगा वडिलांशी भांडत होता, त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी त्याचे हात पाय बांधून त्याला उन्हात फेकून दिले, असे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ओडिसातील केओंझार जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या मुलाचे हात पाय बांधून त्यांना रखरखत्या उन्हात सोडले. कडक उन्हात मुलगा मरण पावला. पत्नी आणि आईला मारहाण करून मयत मुलगा वडिलांशी भांडत होता, त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी त्याचे हात पाय बांधून त्याला उन्हात फेकून दिले, असे सांगितले जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना केओंझार जिल्ह्यातील घाटगाव ब्लॉकमधील सन्मासिनबिला गावातील आहे. सुमंत नायक (40) असे मृताचे नाव असून, 70 वर्षीय पनुआ नायक यांचा मुलगा आहे. रिपोर्टनुसार, मृत सुमंतचा पत्नी आणि आईसोबत वाद सुरू होता. सुमंतने त्यांना मारहाणही केली होती. आई व पत्नीला मारहाण केल्यानंतर त्याने वडिलांच्या दुकानात जाऊन वडिलांशी वाद घातला. तेव्हा सुमंतचे वडील पनुआ यांना राग अनावर झाला होता.
रविवारी पनुआने मुलगा सुमंत याचे हात-पाय बांधून त्याला दुपारी दोन वाजता कडक उन्हात बाहेर सोडले, त्यामुळे उन्हात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. इंडिया टुडेशी बोलताना घाटगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तपन जेना म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृताच्या वडिलांवर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत.
कडक सूर्यप्रकाशात मृत्यूच्या प्रकरणावर डॉक्टर काय म्हणतात?
डॉ. श्रीकांत धर, वरिष्ठ मेडिसिन स्पेशलिस्ट, सम अल्टीमेट हॉस्पिटल, म्हणाले की, जेव्हा बाह्य तापमान 40 अंश ओलांडते. तेव्हा मानवी मेंदूमध्ये हायपरथर्मिया स्थिती उद्भवते, जे शरीराचे तापमान नियंत्रित करते. आपल्या शरीरातील तापमान 37 अंश असते. जोपर्यंत शरीराचे तापमान 100 डिग्री फॅरेनहाइटच्या आत येत नाही, तोपर्यंत शरीराच्या चयापचय प्रक्रियेत कोणतीही अडचण येत नाही. एकदा शरीराचे तापमान 104 फॅरेनहाइटच्या वर वाढले की, हायपरथर्मिया म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास असमर्थता, परिणामी उष्माघात होतो. अवयव निकामी झाल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.