बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेने लुधियानातून घेतले होते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:34 AM2024-10-26T10:34:09+5:302024-10-26T10:35:02+5:30

९ आरोपींच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ

Another arrested in Baba Siddiqui murder case; The crime branch had taken it into custody from Ludhiana | बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेने लुधियानातून घेतले होते ताब्यात

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आणखी एकाला अटक; गुन्हे शाखेने लुधियानातून घेतले होते ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने नवी मुंबई, पुण्यात छापेमारी करत शस्त्रसाठा जप्त केला आहे. याच प्रकरणात लुधियानामधून आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. सुजित सुशील सिंग (३२) असे त्याचे नाव असून, तो जिशान अख्तरशी संबंधित आहे. दरम्यान, या प्रकरणात यापूर्वी  अटक करण्यात आलेल्या ९ आरोपींच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

घाटकोपर, छेडानगरमध्ये राहणारा सुजित खासगी नोकरी करीत होता. तो मूळचा लखनऊचा रहिवासी असून, त्याचे लुधियाना येथे सासर आहे. तो झिशान अख्तरच्या ओळखीचा असून, कनोजिया आणि नितीन सप्रे यांना भेटला होता. त्यांच्यात पैशाचे व्यवहार झाले. तो  कनोजिया आणि सप्रे यांच्या संपर्कात असल्याने त्यांच्याच चौकशीत सुजितचे नाव समोर आले. सिंगला हत्येच्या कटाची माहिती होती. हत्येच्या एक महिना आधी मुंबईतून पसार झाल्याचे आता समोर येत आहे. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

आरोपींच्या चौकशीतून गुन्हे शाखेने पनवेल आणि पुणे येथे छापेमारी करत कनोजिया याच्या पळस्पे फाट्याजवळील कोळके गावातील घरातून पिस्तूल, तीन काडतुसे जप्त केली आहेत. तसेच पुण्यातूनही काही शस्त्रे ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हत्येनंतर देशाबाहेर पाठविण्याचे आश्वासन

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शूटर गुरुमेल सिंग याला पासपोर्ट देऊन देशाबाहेर पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गुरुमेल याला यापूर्वी दाखल असलेल्या हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याची भीती होती, अशी माहितीही चौकशीत समोर आली.

Web Title: Another arrested in Baba Siddiqui murder case; The crime branch had taken it into custody from Ludhiana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.