लग्न लावून अर्थिक फसवणुकीचा राधानगरी तालुक्यात आणखी एक गुन्हा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 10:48 PM2021-12-17T22:48:15+5:302021-12-17T22:48:22+5:30
प्रवीण राजाराम बोरनाक यांनी ही फिर्याद दिली आहे.
राधानगरी- राधानगरी तालुक्यातील धामोड येथील दोघांची अगोदर लग्न झालेल्या मुलींशी लग्ने लावून पाच लाख सत्तर हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी वधू सह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे म्हासुर्ली पैकी जोगमवाडी इथली घटना ताजी असतानाच हा प्रकार उघड झाल्याने राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रवीण राजाराम बोरनाक यांनी ही फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण बोरनाक आणि श्रीकांत ज्ञानदेव जाधव यांनी लग्ने जुळवण्यासाठी मध्यस्थांची मदत घेतली. छाया प्रकाश दामुगडे रा. घानवडे ता.करवीर,संध्या विजय स्वप्रेकर रा. सांगली, पांडुरंग कदम रा. चिकोडी जि.बेळगाव, प्रियंका राजू जाधव रा.मुंबई, चेतन प्रल्हाद गायकवाड रा.सोलापूर, पंकज श्रावण भालेराव रा.सोलापूर, मेघा राजाराम मुळेद रा. सांगली,या मध्यस्थानी प्रवीण याचे पूनम कुमार जीवने रा.चिकोडी जि. बेळगाव हिच्याशी व श्रीकांत याचे अश्विनी श्रावण भालेराव रा.सोलापूर यांच्याशी लग्न जुळवून दिले. नोव्हेंबर महिन्यात ही लग्ने धामोड येथे पार पडली.
या दोन्ही मुलींची अगोदर लग्ने झाली असतानाही माहिती लपवून विवाह लावून दिला.यासाठी प्रवीण यांच्याकडून रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिन्यासह तीन लाख नव्वद हजार रुपये . व श्रीकांत याच्याकडून रोख व सोने असे एक लाख ऐंशी हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रवीण बोरनाक यांनी आज वरील नऊ जणांवर राधानगरी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही एन घाडगे,बजरंग पाटील तपास करत आहेत.