श्रीमंत तरुणींना जाळ्यात ओढणार्या बुबणे याच्याविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 09:07 PM2020-06-17T21:07:35+5:302020-06-17T21:08:36+5:30
आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आईचे आजारपण तसेच हॉटेल व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करुन तिच्याकडून ९३ हजार रुपये उकळले.
पुणे : श्रीमंत कुटुंबातील महिलांना जाळ्यात ओढून त्यांची कोट्यवधींची फसवणुक करणाऱ्या अनिकेत बुबणे याच्याविरुद्ध आणखी एका तरुणींने पुढे येऊन फिर्याद दिली आहे. बुबणे याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळी कारणे सांगून तिची ९३ हजार रुपयांची फसवणुक केली आहे.
बिबवेवाडी येथील एका व्यावसायिकाच्या घरातील महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनिकेत सुरेंद्र बुबणे (वय ३०, रा़ श्रीकृपा अपार्टमेंट, बालाजीनगर, धनकवडी) याने या महिलेला तिच्याच घरात चोरी करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्या सांगण्यावरुन महिलेने त्याला घरातील १ कोटी रुपये व दागिने चोरण्यास मदत केली होती. सुमारे पावणे दोन कोटीचा ऐवज घेऊन बुबणे पसार झाला होता. त्याने फसविलेल्या एक तरुणीच्या मदतीने गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने त्याला अटक केली होती.
त्याने कोंढवा येथील एका २८ वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले होते. ही तरुणी खासगी कंपनीत कामाला आहे. सोशल मिडियावरील एका साईटवर त्यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आईचे आजारपण तसेच हॉटेल व्यवसायात तोटा झाल्याची बतावणी करुन तिच्याकडून ९३ हजार रुपये उकळले होते.
बुबणे याला पकडल्याचे या तरुणीला समजल्यानंतर तिने गुन्हे शाखेकडे येऊन तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे अधिक तपास करीत आहेत.