वाधवा पिता-पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 07:05 AM2020-01-23T07:05:42+5:302020-01-23T07:05:45+5:30

४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलच्या राकेशकुमार वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Another crime against Wadhwa Son & father | वाधवा पिता-पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा

वाधवा पिता-पुत्रांविरुद्ध आणखी एक गुन्हा

Next

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलच्या राकेशकुमार वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाहूर येथे सुरू असलेल्या मॅजेस्टिक प्रकल्पात वाधवा पिता-पुत्राने स्वस्त दरात आलिशान घर देण्याचे स्वप्न दाखवून ४००हून अधिक जणांची २०० कोटींना फसवणूक केली आहे. पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला.

मालाडचे रहिवासी चंद्रकिशोर सोभाराम कोलींदीवाला (६९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकिशोर यांचा टॅÑव्हलचा व्यवसाय आहे. २०१०मध्ये त्यांनी नवीन सदनिका घेण्याचे ठरवून शोध सुरू केला. त्याच दरम्यान दैनिकातून नाहूर येथे सुरू असलेल्या मॅजेस्टिक टॉवरबाबत माहिती मिळाली. तेथील दर परवडणारे असल्याने त्यांनी तेथे गुंतवणूक करण्याचे ठरवले. यामध्ये त्यांना साडेपाच हजार प्रती चौरस फुटाच्या दराने सदनिका देत, २०१३मध्ये ताबाही मिळणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, २०११मध्ये त्यांना १९व्या माळ्यावर ८६ लाख ३५ हजार ६८० रुपयांत १५७० चौरस फुटांचे घर देण्याबाबत व्यवहार ठरला. त्यांनी एचडीआयएल कंपनीस ८१ लाख रुपये दिले. हक्काच्या आलिशान घरात जाण्याचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात झाली. मात्र, २०१३ उलटूनही प्रकल्प अर्धवट राहिल्याने चंद्रकिशोर यांच्यावर हक्काच्या घरासाठी वणवण करण्याची वेळ ओढावली. सुरुवातीला विविध परवानग्यांअभावी काम रखडल्याचे सांगून टोलवाटोलवी सुरू झाली. पुढे, २०१५मध्येही घराचा ताबा न मिळाल्याने एचडीआयएलच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली.

रेरा अ‍ॅथॉरिटीकडेही गुंतवणूकदारांनी धाव घेतली. तेथे २७ डिसेंबर रोजी कंपनीने बंद असलेले काम एप्रिल २०१९पर्यंत सुरू करीत ३० डिसेंबर २०२०पर्यंत ओसी प्राप्त करून गुंतवणूकदारांना सदनिकांचा ताबा देण्याबाबत सांगितले.
काम पूर्ण न झाल्यास रेरा सेक्शन ७ नुसार, त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या. मात्र, तरीदेखील काम पूर्ण न झाल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा रेराकडे धाव घेतली. चंद्रकिशोर यांच्यासारख्या ४००हून अधिक जणांनी यात २०० कोटींची गुंतवणूक केल्याचे समोर येताच, त्यांनी एकत्रित येत गेल्या वर्षी मॅजेस्टिक टॉवर फ्लॅट ओनर असोसिएशन नावाने नोंदणी करत हक्काच्या घरासाठी लढा उभारला.
पाठपुराव्याअंती अखेर १८ जानेवारी रोजी वाधवा पिता-पुत्रांसह ललित मोहन मेहता, संध्या बालीगा, राजकुमार अगरवाल, हजारी लाल, कंपनी सचिव दर्शन मुजुमदार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

आम्हाला हक्काचे घर हवे

आम्हाला ठरल्याप्रमाणे लवकरात लवकर हक्काचे घर मिळावे हीच अपेक्षा आहे. यात अनेकांना रस्त्यावर येण्याची वेळ ओढावली आहे. कामधंदा सोडून यामागे धावपळ सुरू आहे. काही जण तर सध्या भाड्याच्या घरात दिवस काढत आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकर निकाली लावणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी.
- चंद्रकिशोर सोभाराम कोलींदीवाला, अध्यक्ष, मॅजेस्टिक टॉवर फ्लॅट ओनर असोसिएशन

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
वाधवा पिता-पुत्राविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी दिली.

Web Title: Another crime against Wadhwa Son & father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.