कुख्यात आंबेकर आणि भाच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:47 AM2019-11-27T00:47:00+5:302019-11-27T00:48:00+5:30
इतवारीतील प्रतिष्ठित परिवारातील व्यावसायिकाला धमक्या देऊन २५ लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याचा भाचा शैलेष केदार या दोघांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारीतील प्रतिष्ठित परिवारातील व्यावसायिकाला धमक्या देऊन २५ लाखांची खंडणी उकळणारा कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याचा भाचा शैलेष केदार या दोघांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एक गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचा परिणाम म्हणून आंबेकर टोळीकडून वेठीस धरल्या गेलेले अनेक पीडित आता पुढे येत असून, हे प्रकरण त्यातीलच एक दुवा असल्याचे मानले जाते.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अविनाश जोहरापूरकर यांच्या तक्रारीवरून मंगळवारी लकडगंज ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. जोहरापूरकर यांनी काही वर्षांपूर्वी इतवारीतील दारोडकर चौकात आरणा कॉम्प्लेक्स उभारले. येथील व्यापारी गाळ्यांची विक्री करून देतो, असे सांगून माहिती मिळवणाऱ्या संतोष-शैलेष या मामा-भाच्याने जोहरापूरकर यांना नंतर धमकावणे सुरू केले. आम्हाला एक व्यापारी गाळा दे किंवा २५ लाख रुपये दे, असे म्हणून त्यांनी जोहरापूरकर यांच्या व्यवहारात ढवळाढवळ सुरू केली. येथे आमच्या परवानगीशिवाय कुणीही काही खरेदी करणार नाही, अशी कुख्यात आंबेकर आणि त्याच्या भाच्याने भूमिका घेतल्याने जोहरापूरकर कुटुंबीयांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास झाला. त्यांनी या गुंडाच्या जाचातून मोकळे होण्यासाठी त्याला २५ लाख रुपयांची खंडणी दिली. विशेष म्हणजे, कायद्याची चांगली जाण असूनही आंबेकरविरुद्ध प्रभावी कारवाई होत नसल्याचे माहीत असल्यामुळे जोहरापूरकर कुटुंबीयांनी त्याला खंडणी देणे पसंत केले. मात्र, ते शल्य त्यांना होतेच. आता पोलिसांनी कारवाईचा धडाका लावल्याने अखेर अविनाश जोहरापूरकर यांनी वरिष्ठांची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर, लकडगंज ठाण्यात संतोष आंबेकर आणि शैलेष केदारविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मामा-भाचे अन् बाकीच्यांचे काय?
तीन दशकांपासून गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या संतोष आंबेकर आणि टोळीने अनेकांचे जगणे मुश्किल करून सोडले आहे. अनेकांची मालमत्ता हडपून त्यांना आंबेकर टोळीने उद्ध्वस्त केले आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या करड्या भूमिकेमुळे आंबेकरविरुद्ध सोनेगाव, तहसील, लकडगंज ठाण्यात वेगवेगळे १० गुन्हे दाखल झाले आणि अजून काही गुन्हे दाखल होणार आहेत. मात्र, संतोषची पाठराखण
करणाऱ्यांनाही पोलिसांनी हुडकून त्यांना बेड्या ठोकाव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.