परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा; क्रिकेट बुकीने केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 05:16 PM2021-07-29T17:16:23+5:302021-07-29T17:18:25+5:30
Parambir Singh : एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले आहे.
ठाणे - ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त तथा गृहरक्षक दलाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांच्यासह काही अधिकाऱ्यां विरुद्ध खंडणी वसुलीची तक्रार एक क्रिकेट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या घटनेने सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
परमबीर आणि त्यांच्या तत्कालीन खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुरुवारी जलान याने ही लेखी तक्रार दाखल केली आहे. एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले आहे.
ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी आपल्याला धमक्या देऊन साडे तीन कोटी रुपये उकळल्याचा गंभीर आरोप जालान यांनी केला. एवढेच नाही तर आपले मित्र केतन तन्ना यांच्याकडून देखील एक कोटी 25 लाख रुपये वसुली केल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि त्यांच्या टीम मधील राजकुमार कोथमिरे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेल मध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला. काही खाजगी व्यक्ती व कुख्यात गुंड पोलिसांचे एजन्ट म्हणून ही सगळी वसुली करीत होते, असे देखील जलान यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, परमबीर सिंगविरोधात ठाण्यात आता पर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून ही तिसरी तक्रार दाखल करण्यात आली आहे.