दीपक मानकरवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 08:46 PM2018-10-29T20:46:30+5:302018-10-29T20:48:22+5:30
दीपक मानकर यांच्याविरुद्ध व्यावसायिकाला २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा हडपसर पोलिसांनी दाखल केला आहे.
पुणे : जितेंद्र जगताप यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरुद्ध व्यावसायिकाला २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा हडपसर पोलिसांनी दाखल केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या आदिती माधव दीक्षित यांना वारसाहक्काने मिळालेल्या मिळकतीची बनावट कागदपत्रे तयार करुन ती तिसऱ्या व्यक्तीला विक्री केली़. विक्री करताना पुरेसा मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दीपक मानकर, साधना वर्तक आणि मुकंद दीक्षित यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हडपसर पोलिसांनी दीपक मानकर यांच्यासह अमित बेहडे, गुरुनामसिंग बतियानी व इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अजय अग्रवाल यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी सांगितले की, हडपसर येथील भेकराईनगर ग्लायडिंग सेंटरजवळ बेहडे टॉवर आहे. येथील जमीन विकसित करण्याचा अमित बेहडे आणि अजय अग्रवाल यांच्या विकसन करार २००३ मध्ये झाला होता. काही काळाने त्यांच्यात व्यावसायिक वाद उत्पन्न झाला व प्रकरणी न्यायालयात गेले. दरम्यान, २०१५ मध्ये बेहडे यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी दीपक मानकर यांना सुपारी दिली़. मानकर यांनी अजय अग्रवाल यांच्याकडे २५ लाख रुपयांची सुपारी मागितली होती. अग्रवाल यांनी आजवर घाबरुन याची माहिती कोणाला दिली नव्हती. दीपक मानकर यांच्याविरुद्ध कोथरुडला गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी हडपसर पोलिसांकडे खंडणी मागितल्याची फिर्याद दिली़. त्यानुसार हडपसर पोलिसांनी दीपक मानकर, अमित बेहडे, गुरुनाम सिंग बतियानी व इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे करीत आहेत.