भिवंडीत बोगस पोलिसांचा सुळसुळाट, दागिने चोरीची दुसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 06:00 PM2022-01-15T18:00:46+5:302022-01-15T18:01:05+5:30
Crime News: भिवंडीत बोगस पोलिसांकडून भर रस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडे गाडीचे कागदपत्र तपासणीच्या नावाने मागत पोलीस असल्याचे सांगून दागिने काढून ठेवण्याचा सल्ला देत दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे...
- नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडीत बोगस पोलिसांकडून भर रस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडे गाडीचे कागदपत्र तपासणीच्या नावाने मागत पोलीस असल्याचे सांगून दागिने काढून ठेवण्याचा सल्ला देत दागिने चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत बनावट पोलीस बनून आलेल्या दोघा जणांनी मंदिरात जाऊन घरी परतणाऱ्या दोघा जणांना रस्त्यात थांबवून पोलीस असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून दागिने लुबाडण्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
अनिलकुमार चंपकलाल मास्टर ( वय ५८ ) हे आपल्या पत्नीसह वडपा येथील खोडियार माता मंदीर येथे दर्शनासाठी जाऊन दुपारी अडीच वाजता आपल्या दुचाकी वरून घरी जात असताना सरवली फाटा, रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ उभ्या असलेल्या दोघा व्यक्तींनी दुचाकी थांबविण्यास इशारा करीत एकाने आम्ही स्पेशलवाले पोलीस असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवीत तुम्ही हेल्मेट घातलेले नाही.मास्क व्यवस्थित तोंडावर लावला नाही असे सांगत दुचाकी वरील पतीपत्नीस पुढे खुन झालेला आहे. तुमचे जवळील दागिने काढुन पिशवीत ठेवा असे बोलून सदर इसमांनी अनिलकुमार व त्यांच्या पत्नीला बोलण्यात गुंतवून हातचलाकी करून पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन व दोन सोन्याच्या बांगडया लबाडीने घेवुन दोघा पति पत्नीची फसवणूक करून त्या ठिकाणाहून पसार झाले. या प्रकरणी अनिलकुमार यांनी कोनगाव पोलिस ठाणे गाठून आपली कैफियत सांगितली असता पोलिसांनी दोघा बनावट पोलीस बनून आलेल्या अज्ञातां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
चार दिवसांपूर्वी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानकोली नाका येथे दुचाकी वरून जाणाऱ्या एक वयोवृद्धास गाठत त्यास पोलीस असल्याचे भासवित त्याच्या जवळील ७५ हजार रुपय किमतीची सोन्याची चैन घेऊन बोगस पोलीस चोरटे फरार झाल्याची घटना घडली होती . चक्क पोलीस असल्याची बाटवामि करून नागरिकांची लूट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने भिवंडी पोलिसांसमोर या बोगस पोलिसांच्या मुसक्या वळण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले आहे . दरम्यान रस्त्यात अशा प्रकारे कोणी सांगून फसवीत असताना नागरीकांनी स्वतः सह आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी केले आहे.