अजून एक 'कंझावाल प्रकरण', मृतदेहाला 10 KM फरफटत नेले, रस्त्यावर विखुरले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 02:28 PM2023-02-07T14:28:47+5:302023-02-07T14:29:28+5:30
मथुरातील यमुना एक्सप्रेस-वेवर दिल्लीतील कंझावालसारखी घटना घडली आहे.
मथुरा: काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या कंझावाल परिसरात तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. तशाच प्रकारची घटना मथुरा जिल्ह्यात घडली आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर एका स्विफ्ट कारने तरुणाचा मृतदेह सुमारे 10 किलोमीटरपर्यंत फरफटत नेला. टोल प्लाझावर गाडी थांबली तेव्हा सुरक्षा रक्षकांनी हे भयंकर दृष्य पाहिले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचे तुकडे पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
मथुरेतील थाना मंत भागात यमुना एक्सप्रेस वेवर स्विफ्ट कारमध्ये अडकलेला मृतदेह आढळून आला आहे. अनेक किलोमीटरपर्यंत खेचल्यामुळे मृतदेहाचे तुकडे-तुकडे झाले होते. टोल भरण्यासाठी यमुना एक्स्प्रेस वे माँट टोलवर स्विफ्ट कार थांबताच गाडीमागील दृश्य पाहून सुरक्षा रक्षक चक्रावले. स्विफ्ट कारच्या मागे तरुणाचा मृतदेह लटकला होता. घाईघाईत ही माहिती पोलिसांना देण्यात आली. मृतदेहाची अवस्था पाहून घटनास्थळी पोहोचलेले पोलीसही अचंबित झाले.
एसपी ग्रामीण त्रिगुण विशन यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर असे आढळून आले की यमुना एक्सप्रेसवेच्या माइलस्टोन 106 वर बूट, मोबाईल आणि मृतदेहाचे अवशेष पडलेले आहेत. या ठिकाणी अपघात झाल्याची शक्यता आहे. कार चालकाने सांगितले की, यमुना एक्स्प्रेस वेवर धुके होते, त्यामुळे मृतदेह गाडीला अडकल्याची माहिती नव्हती. अपघात अन्य कोणत्यातरी वाहनाने झाला असावा आणि त्याचा मृतदेह गाडीत अडकला असावा. सध्या एक्स्प्रेस वेवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिस अपघाताचे कारण शोधत आहेत.
दिल्लीतील कंझावाला प्रकरणाने देश हादरला
जानेवारी महिन्यात दिल्लीतील कंझावाला भागात असाच एक प्रकार समोर आला होता. एका इव्हेंट कंपनीत काम करणाऱ्या अंजली सिंग (20) या तरुणीच्या स्कूटीला एका कारने धडक दिली आणि मुलीला सुमारे 12 किलोमीटरपर्यंत खेचले. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. इतकंच नाही तर दिल्ली पोलिसांनी पेट्रोलिंगवर असलेल्या आपल्या 11 कर्मचार्यांनाही निलंबितही केले.