नागपुरात आणखी एका एमडी विक्रेत्याला अटक, तलवार देखील जप्त
By योगेश पांडे | Published: June 20, 2024 02:47 PM2024-06-20T14:47:13+5:302024-06-20T14:48:20+5:30
गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
नागपूर : उपराजधानीत एमडी खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले असून पोलिसांच्या कारवाईतदेखील वाढ झाली आहे. तीन भावांना एमडी तस्करी करताना पकडल्यानंतर काही तासांतच नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीस्वाराकडून ८९ हजारांची एमडी पावडर जप्त करण्यात आली. आरोपीच्या दुचाकीत तलवार देखील आढळली. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
बुधवारी दुपारच्या सुमारास पोलिसांचे पथक गस्तीवर असताना सद्भावना नगर येथे एमडी घेऊन एक तरुण दुचाकीवर जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दुर्गा माता मंदिराजवळ एमएच ४९ सीएच ७८६२ या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला अडविले. त्याने त्याचे नाव मोहम्मद अबरार निसार अन्सारी (२४, सद्भावना नगर) असे सांगितले. त्याची व वाहनाची झडती घेण्यात आली असता त्याच्याजवळ ८.९१ ग्रॅम एमडी आढळली.
तर गाडीच्या डिक्कीत तलवार होती. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अबरारविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गात गुन्हा नोंदवून त्याला नंदनवन पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, प्रदीप पवार, मनिष बुरडे, संतोष गुप्ता, संदीप पडोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.