महाराष्ट्र ग्रामीण बॅंक कर्मचाऱ्यांची आणखी एक हेराफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 11:36 PM2021-12-05T23:36:57+5:302021-12-05T23:37:14+5:30
भडगाव : तारण सोने काढून ठेवले दुसऱ्यांच्या नावावर, पाच जणांना अटक
भडगाव जि. जळगाव : आमडदे ता. भडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बॕकेतील चोरी प्रकरणात कर्मचाऱ्यांनीच हेराफेरी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. या बॅंकेतील तारण सोने काढून कर्मचाऱ्यांनीच अन्य बॅंकेत दुसऱ्याच्या नावावर तारण ठेवले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता आठ झाली आहे.
इंद्रनील पाटील (रा. भडगाव), राजेद्र गोबा पाटील, राजेद्र रामराव पाटील, हेमराज मधुकर पाटील (रा. आमडदे), रणजित मुरलीधर पाटील (रा. वरखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बॕकेत तारण ठेवलेले सहा किलो सोने बॅंक कर्मचाऱ्यांनीची चोरुन नेले होते. या सोन्याची किंमत ३ कोटी १७ लाख रुपये आहे. ही घटना मंगळवार ३० रोजी घडली होती. यात बॕकेतील शिपाई राहुल अशोक पाटील, विजय नामदेव पाटील, विकास पाटील यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. तीनही आरोपीना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, बॕकेत तारण ठेवण्यात आलेल्या सहा किलो सोन्यापैकी २१ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे ४३८ ग्रॅम सोने कमी भरले. यामुळे बॕकेचे मॕनेजर तन्मय अजय देशपाडे यांनी पोलिसात पुन्हा फिर्याद दिली.
शेतकरी कर्जदार यांनी ठेवलेल्या तारण सोन्याची राहुल अशोक पाटील, विजय नामदेव पाटील यांनी अदलाबदल केली. एवढेच नाही तर तारण ठेवलेले सोने काढून ते वरील पाच जणांच्या ताब्यात दिले आणि तेच सोने या पाचही जणांच्या नावाने अन्य बॕकेत पुन्हा तारण ठेवले आणि त्यावर कर्जही घेतल्याचे समोर आले आहे. या सर्वांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या चोरी प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी दिली.