एकाच दिवशी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची तीन ठिकाणी सापळा रचून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 09:22 PM2019-04-25T21:22:29+5:302019-04-25T21:28:54+5:30
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे गुरुवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी पोलिसांवर सापळा कारवाई करुन तीन पोलिसांसह चौघांना पकडले आहे़.
पुणे : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे गुरुवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी पोलिसांवर सापळा कारवाई करुन तीन पोलिसांसह चौघांना पकडले आहे़. ही कारवाई वानवडी पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार, शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार अशा तिघांवर कारवाई करण्यात आली आहे़.
तक्रारदार यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त होता़. या अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक पोलीस फौजदार अनिल कोळेकर (वय ५४) यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली़. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला ही तक्रार मिळाल्यानंतर गुरुवारी त्याची पडताळणी करण्यात आली़. त्यानंतर कोरेगाव भीमा पोलीस चौकीत सापळा रचला़ तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारताना अनिल बाबुराव कोळेकर याला पकडण्यात आले़.
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचे काम करणाऱ्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज हरी काळे (वय ५२) यांनी वेतन निश्चितीसाठी सहायक पोलीस निरीक्षकाकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली होती़. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात सापळा रचला़ तक्रारदाराकडून ३ हजार रुपये लाच घेताना मनोज काळे यांना पकडण्यात आले़.
चोरीचा माल खरेदी करत असल्याचा आरोप करत कारवाई न करण्यासाठी भंगार व्यवसायिकाकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना खासगी व्यक्तीसह पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.
पोलीस हवालदार निसार मेहमुद खान (वय ४४) आणि मेहंदी अजगर शेख (वय ३२, रा़ हडपसर) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत़. .याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली होती़.
तक्रारदार यांचा हडपसर येथील आनंदनगरमध्ये भांगाराचा व्यवसाय आहे़. पोलीस हवालदार निसार खान याने त्यांच्यावर चोरीचा माल खरेदी करीत असल्याचा आरोप करुन तशा तक्रारी आल्या आहेत, असे सांगितले़. त्यामध्ये कारवाई करायची नसेल व भंगाराचा धंदा पुढे चालू ठेवायचा असेल तर १५ हजार रुपयांची मागणी केली़. तेव्हा या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ एप्रिलला तक्रार केली़. तक्रारीची पडताळणी करताना हवालदार खान याने ५ हजार रुपये स्वीकारण्याची तडजोड केली़. त्यानुसार गुरुवारी दुपारी हडपसर येथील ताज फर्निचरजवळ सापळा रचण्यात आला़. खान याच्या सांगण्यावरुन मेहंदी शेख याला पकडण्यात आले़ त्यानंतर खान यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे़.