अँटी आयर्न कॉईन बनवून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीला अटक

By धीरज परब | Published: September 28, 2024 02:12 PM2024-09-28T14:12:46+5:302024-09-28T14:14:06+5:30

टोळीने राज्यातील अनेक भागातील लोकांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. 

Anti-Iron coin fraud gang arrested in miraroad | अँटी आयर्न कॉईन बनवून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीला अटक

अँटी आयर्न कॉईन बनवून पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या टोळीला अटक

मीरारोड - चमत्कारिक अँटी आयर्न कॉईन किंवा राईस पुलर कॉईनला मोठी मागणी असून असे कॉईन बनवून त्याची विक्री करून चांगला फायदा मिळवून देतो सांगत फसवणूक करणाऱ्या चार जणांच्या टोळीला नया नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. टोळीने राज्यातील अनेक भागातील लोकांची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. 

मीरारोडच्या नया नगर भागातील मरियम इमारतीत राहणारे एजाज करीमुद्दीन सय्यद यांना कपिल रा. बोरिवली याने अँटी आयर्न कॉईनबनवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे केमिकल आणून तो कॉईन बनवल्यानंतर बाजारात त्याच्या विक्रीतून चांगला फायदा मिळतो असे सांगितले. त्यानुसार सय्यद यांनी ५० हजार रुपये कपिलला दिले होते. परंतु कपिलने कॉईन बनवून फायदा तर दूरच पण मुद्दल सुद्धा न दिल्याने सय्यद यांनी नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करून सहायक आयुक्त राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे व निरीक्षक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पराग भाट, उपनिरीक्षक महेंन्द्र लोणे व धनंजय गायकवाड सह राजेश काळपुंड,  विकास यादव, विजय गुरव, महेश खामगळ, प्रमोद केंन्द्रे,  मनोज साबळे, बाळासाहेब पाटील, सौरभ इंगळे, रेहमत पठाण, समीर वाळुंज, विकी पवार यांच्या पथकाने तपास सुरु केला. 

पोलिसांना कपिल याचे छायाचित्र व फुटेज मिळून आल्याने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण द्वारे तपास करत कपिल हरिश्चंद सिकोरिया ( ३७ ) रा . मारू निवास , कार्टर रोड क्र . ७ , बोरिवली ह्या शिंपीकाम करणाऱ्यास अटक केली . त्याच्या चौकशी नंतर टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करणारा सुरज नामदेव मोरे (वय ४१  ) व  सनी सुहास दत्ता  (वय २४ ) दोघे  रा . एसपेरेन्स बिल्डींग, क्रॉस गार्डन, भाईंदर व दलाली करणारा किरण कालुभाई परमार ( वय ३३ ) रा . न्यु सनराईज बिल्डींग, आरएनपी पार्क, भाईंदर पूर्व  अन्य तीन जणांना अटक करण्यात आली  

ही टोळी, लोकांना अँटी आयर्न कॉईनला बाजारात मोठी किंमत मिळते व हे कॉईन बनवण्यासाठी विशिष्ठ केमीकल लागते आणि त्यासाठी खर्च येतो असे सांगत. कॉईनसाठी खर्च केल्यास त्याच्या विक्रीतून चांगला फायदा मिळून तो देण्याचे आमिष हे लोकांना दाखवतं. टोळीने अशा प्रकारे कोल्हापुर, ठाणे, वसई, नालासोपारा, चिपळूण, पुणे, लातुर, भांडुप आदी भागातील अनेकांकडून असे कॉईन बनवून देण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळले आहेत. तशी कबुली आरोपींनी पोलीस तपासात दिली आहे. 

 

अँटी आयर्न कॉईनचे महत्व सांगत. एका खोलीत तोंडावर मास्क व हातात ग्लोज घालुन लोकाना दुर उभे करुन तांब्याचा कॉईन दाखवत . त्यावर रसायन , ग्लीसरीन, पावडर, मुलतानी माती, लाल रंगाची पॅरामॅगनेशन पावडर , निळया रंगाची कॉपर सल्फेट पावडर , ऑईल असे वापरत . केमीकल खुप स्ट्रांग आहे, त्यामुळे कॅन्सर होवु शकतो असे सांगत . खाली लोहचुंबक ठेऊन मग त्यावर कापूस ठेवत रासायनिक प्रक्रिया केलेले तांब्याचे नाणे ठेवत . मग धाग्यता सुई घालून ती त्या नाण्याच्या वर धरली कि खाली लपवून ठेवलेल्या लोहचुंबक मुळे ती सुई ६० डिग्री फिरत असे . सुई ९० डिग्री फिरल्यावर कॉईन परिपूर्ण होणार असे सांगून त्यासाठी देखील पैसे मागितले जात होती . 

 

आता पर्यंत तिघांची १४ लाख ५० हजारांना फसवणूक केली गेली आहे . तर एकूण ३० ते ४० जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून पोलीस फसवणूक झालेल्या लोकांशी संपर्क करून फसवणुकीची माहिती घेत आहेत . आरोपीं कडून अनेक तांब्याची नाणी , रासायनिक व अन्य साहित्य आदी जप्त केले आहे . सहायक पोलीस निरीक्षक पराग भाट हे तपास करत आहेत . 

Web Title: Anti-Iron coin fraud gang arrested in miraroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.