दहशतविरोधी यंत्रणांच्या रडारवर ‘क्रिप्टो’चे ॲप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 05:38 AM2021-07-20T05:38:18+5:302021-07-20T05:39:05+5:30
बनावट ॲपच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली शेकडो कोटींची रक्कम गिळंकृत करणाऱ्या ठकबाजांनी कोट्यवधी रुपये दहशतवाद्यांकडे वळते केल्याचा संशय आहे.
नरेश डोंगरे। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट ॲपच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सी एक्स्चेंजच्या नावाखाली शेकडो कोटींची रक्कम गिळंकृत करणाऱ्या ठकबाजांनी कोट्यवधी रुपये दहशतवाद्यांकडे वळते केल्याचा संशय आहे. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण लक्षात आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून, लवकरच मोठी कारवाई होण्याची माहिती खास सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
विविध फसव्या ॲपच्या माध्यमातून शेकडो कोटी गोळा करणाऱ्यांपैकी काहींना उत्तराखंड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यात महाराष्ट्राचेही कनेक्शन असल्याची विश्वसनीय माहिती नाव न छापण्याच्या अटीवर शीर्षस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली.
गेल्या काही वर्षांत पॉवर बँक, ईझी कॉईन, ईझी पॉईंट, फिश प्लस, सन फॅक्ट्री नावाने ॲप सोशल प्लॅटफॉर्मवर जोरात चालत आहेत. बहुतांश ॲप चिनी असून, त्यांच्या माध्यमातून शेकडो कोटींच्या उलाढालीचा आभास निर्माण करण्यात आला आहे. हे ॲप वापरणाऱ्यांना अल्पावधीत आपली रक्कम कशी दामदुप्पट होते, ते एजंटकडून सांगितले जाते. ॲप संचालित करणाऱ्या ठकबाजांनी देशातील विविध प्रांतात असे एजंट नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या रकमेची हेराफेरी केली जाते. लाखो गुंतवणूकदारांचे शेकडो कोटी रुपये या रॅकेटने स्वत:च्या खात्यात वळते करून घेतले आहेत. यातील कोट्यवधी रुपये दहशतवादी संघटनांशी कनेक्ट असलेल्या संशयितांकडे वळते करण्यात आल्याची माहिती आहे. सूत्रांच्या मते, ठकबाजांच्या खात्यात असलेले ३०० कोटी गोठवण्यात आले आहेत.
१२ राज्यांत मायाजाल
उत्तराखंड पोलिसांच्या तपास यंत्रणा गतिमान झाल्या. त्यानंतर फसवणुकीची देशभरातील २३३ प्रकरणे पुढे आली. त्यात सर्वाधिक १७८ प्रकरणे तेलंगणातील आहेत. तसेच बंगालमधील १९, उत्तर प्रदेशातील १३, हरियाणा ५, तामिळनाडू ४, कर्नाटक ३, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी २ आणि दिल्ली, बिहार तसेच चंदीगडमधील एकाचा खुलासा झाला आहे.
विदेशी खाती अन् शेकडो सीम
आरोपींनी ॲप चालविण्यासाठी, गुंतवणूकदारांची रक्कम स्वीकारण्यासाठी, ती खात्यांत वळती करण्यासाठी वेगवेगळ्या सीमकार्डचा वापर केला.