Antilia Bomb Scare : मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओप्रकरणी तिहार जेलमधील दहशतवादी अख्तरकडून मोबाईल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 01:56 PM2021-03-12T13:56:24+5:302021-03-12T13:57:52+5:30
Antilia Bomb Scare : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका शोध मोहिमेदरम्यान तो ताब्यात घेतला.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवास्थानासमोर स्फोटक ठेवल्याची जबाबदारी घेणारा मसेज ज्या मोबाईलवरून आला होता. तो मोबाईल तिहार जेलमधला असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. तिहार जेलमधील बॅरेक क्रमांक ८ मध्ये कैद असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी तहसीन अख्तरकडे हा मोबाईल सापडला आहे. दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने एका शोध मोहिमेदरम्यान तो ताब्यात घेतला.
या फोनवरूनच टेलीग्राम चॅनेल चालविला जात असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यातून अंबानींच्या घरासमोर स्फोटक ठेवण्याची जबाबदारी घेण्यात आली होती. फोनची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. अधिकृत सूत्रांच्या हवालाने सांगितले की, खासगी सायबर एजन्सीला तपास यंत्रणेने संबंधित मोबाईल क्रमांक ट्रॅक करण्यास सांगितले होते. त्यानंतर तिहार जेलमधील लोकेशन ट्रेस झाल्यानंतर केंद्रीय एजन्सींनी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला ही माहिती दिली असल्याचे ते म्हणाले.
Based on Spl Cell's info, Tihar Jail authorities seized a cellphone from a jail where certain terror convicts are lodged. It's suspected that the phone was used for operating Telegram channels used recently for claiming responsibility for terror acts/threats:Delhi Police Spl Cell
— ANI (@ANI) March 12, 2021
२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्यात जिलेटीनच्या २० कांड्या, बोगस नंबर प्लेट्स आणि धमकीचे पत्र सापडले होते. या घटनेने मुंबईत खळबळ माजली होती. नंतर अंबानींच्या मोबाईलवर धमकीचा टेलिग्राम मेसेज आला होता. हा मेसेज दिल्लीतील तिहार जेलमधील बराकमध्ये वापरत असलेल्या मोबाईलमधून आला असल्याचं तपासात समोर आलं.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी टेलीग्राम चॅनेल तयार करण्यात आले होते आणि अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ ठेवल्याची जबाबदारी घेणारी मेसेज २७ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अंबानींच्या टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट करण्यात आला होता. या मेसेजमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवण्याची मागणी देखील केली होती आणि ती जमा करण्यासाठीच्या लिंकचा उल्लेख केला होता.
चौकशीदरम्यान ती लिंक “उपलब्ध नाही” म्हणून आढळले, त्यामुळे तपास करणार्यांना हे कोणीतरी त्रास देण्यासाठी कृत्य करत असल्याचा संशय आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नंतर २८ फेब्रुवारीला जैश-उल-हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला आणि घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला गेला.
या प्रकरणातील तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. नंतर गृहमंत्र्यांनी याचा तपास एटीएसकडे सुपूर्द केला. त्यानंतर देखील या प्रकरणाचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA कडे वळविण्यात आला आहे.