Mansukh Hiren's Death Case: मनसुख हिरेनप्रकरणी बड्या पोलीस अधिकाऱ्याला ४५ लाखांची सुपारी; अडचणी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:38 IST2022-05-04T17:38:00+5:302022-05-04T17:38:29+5:30
एनआयएने या प्रकरणी उच्चन्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पोलिसांनी 5 मार्च, 2021 रोजी मुंब्रा खाडीतून मनसुख हिरेनचा मृतदेह बाहेर काढला.

Mansukh Hiren's Death Case: मनसुख हिरेनप्रकरणी बड्या पोलीस अधिकाऱ्याला ४५ लाखांची सुपारी; अडचणी वाढणार
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. या प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेचा हात असल्याचे समोर आले होते. स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनची हत्या झाली होती. या हिरेनच्या हत्येसाठी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याला ४५ लाखांची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एनआयएने या प्रकरणी उच्चन्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. प्रदीप शर्मा यांनी न्यायालयात जामीन अर्ज सादर केला आहे. त्यात एनआयएने विरोध दर्शविला आहे. आता यावरील सुनावणी १७ जुलैला होणार आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्येमागील मुख्य सूत्रधार आहेत. हिरेन यांच्या हत्येचा कट मुंबई पोलीस आयुक्तालयातच रचण्यात आला होता. प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी यासाठीच्या बैठकांना हजेरी लावत होते. वाझे याने त्यांना यासाठी ४५ लाख रुपये दिल्याचे एनआयएने म्हटले आहे.
आरोपपत्रानुसार ३ मार्च रोजी सचिन वाजे यांनी माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत मिटिंग केली. याच मिटिंगमध्ये वाजे याने पैशांनी भरलेली बॅग प्रदीप शर्माला दिली. ज्यामध्ये नोटांचे गठ्ठे भरले होते. पैसे मिळाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी संतोष शेलार याच्याशी संपर्क साधला होता आणि एका वाहनाबद्दल बोलले होते, ज्याचा वापर मनसुख हिरेनच्या हत्येसाठी आणि त्याच वाहनातून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला जाणार होता.
पोलिसांनी 5 मार्च, 2021 रोजी मुंब्रा खाडीतून मनसुख हिरेनचा मृतदेह बाहेर काढला. पूर्वी हे प्रकरण आत्महत्या असल्याचे सांगितले जात होते. पण नंतर हे प्रकरण उघड झाले. एनआयएने या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी रियाझुद्दीन काझी, निरीक्षक सुनील माने, दोषी कॉन्स्टेबल विनायक शिंदे, आनंद जाधव, सतीश मोथकुरी, क्रिकेट बुकी नरेश गौर, संतोष शेलार आणि मनीष सोनी यांच्यासह सचिन वाजे आणि प्रदीप शर्मा यांच्यावरही आरोप केले आहेत.