अन्वय नाईकांच्या पत्नी, मुलीचे 'ते' फोटो व्हायरल; वरुण सरदेसाई भाजपावर संतापले
By हेमंत बावकर | Published: November 7, 2020 06:05 PM2020-11-07T18:05:25+5:302020-11-07T18:07:32+5:30
Anvay Naik Suicide: सतिश निकम नावाच्या अकाऊंटवरून आज्ञा अन्वय नाईक यांचे इन्स्टाग्रामवरील फोटोंचे स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये अन्वय नाईक यांच्या पत्नीचेही फोटो आहेत.
मुंबई : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर बाहेर या अटकेवरून राजकीय वातावरण तापलेले आहे. अन्वय़ नाईक यांनी का आत्महत्या केली ते त्यांच्या आत्महत्येवर आवाज उठविणाऱ्या त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीबाबत वेगवेगळी चर्चा केली जात आहे. नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचे खासगी आयुष्यातील फोटो भाजपाच्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्याने व्हायरल करत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. यावर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी टीका केली आहे.
सतिश निकम नावाच्या अकाऊंटवरून आज्ञा अन्वय नाईक यांचे इन्स्टाग्रामवरील फोटोंचे स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये अन्वय नाईक यांच्या पत्नीचेही फोटो आहेत. तसेच या ट्विटरवरील पोस्टमध्ये नाईक यांची पत्नी आणि मुलगीने घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून टीका करण्यात आली आहे.
या ट्विटवर वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेत, भाजपाच्या आयटी सेलवाले काहीही पसरवत आहेत. मराठी माणसाच्या मागे उभे राहायचे सोडून हे असले सुचते कसे? असा सवाल करत निषेध व्य़क्त केला आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सायबर सेल व ट्विटरला टॅग करत या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या खासगी आयुष्यातील फोटो तिच्या परवानगीशिवाय पोस्ट करण्यावर ही कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे पहा भाजप IT सेल काय पसरवतात..
— Varun Sardesai (@SardesaiVarun) November 6, 2020
मराठी माणसाच्या मागे उभे राहायचे सोडून हे असले सुचते कसे ??
निषेध ! https://t.co/IHzpfkMOBY
अर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?
अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.
Anvay Naik : अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचा
अर्णब गोस्वामींवर नाईक यांच्या पत्नीचे आरोप
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.
"गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"
अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.