एपीआयची सर्विस रिव्हॉल्वर घरातून चोरी, तोतया पोलिसाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 05:13 PM2020-10-22T17:13:53+5:302020-10-22T17:16:11+5:30

Robbery : फिर्यादी अधिकाऱ्यावरच उलटणार प्रकरण

API's service revolver stolen from the house, the glory of the police | एपीआयची सर्विस रिव्हॉल्वर घरातून चोरी, तोतया पोलिसाचा प्रताप

एपीआयची सर्विस रिव्हॉल्वर घरातून चोरी, तोतया पोलिसाचा प्रताप

Next
ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या राहुल राऊत यांनी बुधवारी सायंकाळी सर्विस रिव्हॉल्वर चोरी गेल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांना दिली.दोघी दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये येईपर्यंत गणवेशात आलेल्या चोराने बेडरूममधील लोखंडी कपाटात असलेले लॉकर तोडून त्यातील सर्विस रिव्हॉल्वर, दहा राऊंड व रोख पाच हजार घेवून पोबारा केला, असा घटनाक्रम शहर पोलिसांना सांगितला.

यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्यापासून कायम वादात असलेले सहायक पोलीस निरिक्षक राहुलकुमार राऊत यांच्या घरातून बुधवारी दुपारी सर्विस रिव्हॉल्वर दहा राऊंडसह चोरीस गेली. पोलिसाचा गणवेश घालून आलेल्या चोरट्याने हे कृत्य केले, अशी तक्रार राऊत यांनी दिली आहे. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे असून फिर्यादीवरच उलटणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.


आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या राहुल राऊत यांनी बुधवारी सायंकाळी सर्विस रिव्हॉल्वर चोरी गेल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर खुद्द एसडीपीओ त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, शहर ठाणेदार धनंजय सायरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवारी रात्री घटनास्थळाची पाहणी केली. राऊत हे बांगरनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या माळ्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार बुधवारी दुपारी राऊत व त्यांची पत्नी बाहेर गेले असताना मोलकरीण घरात होती. त्यावेळी पोलीस गणवेश घातलेली एक व्यक्ती घरी आली. त्याने मोलकरणीकडे विचारणा करत घरात प्रवेश केला. त्या व्यक्तीचा संशय आल्याने मोलकरीण मागच्या दरवाजाने बाहेर पळून गेली. तिने पहिल्या मजल्यावर राहात असलेले सहायक पोलीस निरिक्षक कोळी यांच्या पत्नीला हा प्रकार सांगितला.

दोघी दुसऱ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये येईपर्यंत गणवेशात आलेल्या चोराने बेडरूममधील लोखंडी कपाटात असलेले लॉकर तोडून त्यातील सर्विस रिव्हॉल्वर, दहा राऊंड व रोख पाच हजार घेवून पोबारा केला, असा घटनाक्रम शहर पोलिसांना सांगितला. पोलीस अधिकाऱ्याच्याच घरी चोरी झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. गुरुवारी राहुल राऊत यांच्या फ्लॅटवर फॉरेन्सिक पथक, श्वान पथक, बॉम्ब शोध पथक दाखल झाले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध कलम ३८० व १७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.  चोरीला गेलेली रिव्हॉल्वर शोधण्यासाठी कसोसीचे प्रयत्न सुरू आहे. 


अकार्यकारी पदावर असताना शस्त्र कसे?
पोलीस खात्यात अकार्यकारी पदावर असलेला अधिकारी शक्यतोवर शस्त्र बाळगत नाही. ते शस्त्रागारात ठेवले जाते. राऊत हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी संकेताप्रमाणे शस्त्र घरी ठेवणे चुकीचे आहे. शिवाय राऊत यांनी शस्त्रागारात कितीवेळा ती रिव्हॉल्वर सर्विसिंगकरिता दिली याचाही तपास केला जात आहे. राऊत यांच्या तक्रारीची उलट तपासणी सुरू असून त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन, मोलकरीण सांगत असलेल्या आरोपीचा स्केच काढला जात आहे.

विनयभंगाच्या प्रकरणात कारणे दाखवा
मुंबईतील वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी अश्लील चॅटिंग केल्याचा आरोप सहायक पोलीस निरिक्षक राहुलकुमार राऊत यांच्यावर आहे. याप्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी एसपींकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालावरूनच राऊत यांना गुन्हा दाखल का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. मारेगाव ठाण्यातील एसीबी ट्रॅपपासून राहुलकुमार राऊत सतत वादात आहेत.

Web Title: API's service revolver stolen from the house, the glory of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.