कर्मचाऱ्यांचे पगार थकविले; कर्नाटकमधील 'Apple' कंपनीत तोडफोड, जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 01:34 PM2020-12-12T13:34:11+5:302020-12-12T13:34:42+5:30
Apple Iphone Plant : रसापूरमध्ये तैवानची एक कंपनी विस्ट्रॉन Apple चे आयफोन बनविते. या कंपनीत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला.
कर्नाटकमधील Apple Iphone बनविणाऱ्या कंपनीमध्ये मोठी तोडफोड करण्यात आली आहे. ही फॅक्टरी कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील नरसापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे. येथील कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार न दिल्याने त्यांनी ही तोडफोड केल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि आंदोलकांना मागे पाठविले. काही लोकांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. नरसापूरमध्ये तैवानची एक कंपनी विस्ट्रॉन Apple चे आयफोन बनविते. या कंपनीत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. काचेचे दरवाजे आणि केबिनही फोडल्या. तसेच उभ्या असेलल्या वाहनांना आग लावली. ही तोडफोड खूप वेळ सुरु होती. याचसोबत दगडफेकही करण्यात आली. कंपनीच्या नावाच्या बोर्डालाही आग लावण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून पगारच दिला नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. कंपनी नेहमी पगार देण्याचे आश्वासनच देत होती, मात्र पैसे दिले नाहीत. यामुळे घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. या रागात कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली आहे.
कर्मचाऱ्यांचा संताप पाहून कंपनीच्या व्यवस्थापनाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी हिंसक झालेल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळविले आहे. कंपनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा तपासही करत आहेत.