आपेटने उस्मानाबादकरांना ४ कोटींना गंडविले; तीन ठाण्यात ५९ ठेवीदारांनी केल्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:21 PM2018-08-25T14:21:18+5:302018-08-25T14:26:51+5:30
शुभकल्याण मल्टीस्टेटच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत़
उस्मानाबाद : शुभकल्याण मल्टीस्टेटच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत़ या संस्थेचा प्रमुख दिलीप आपेट व त्याच्या संचालक मंडळाने जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे़ यातील आजवर केवळ ५९ ठेवीदार तक्रारीसाठी पुढे आले आहेत़ त्यांची रक्कम ३ कोटी ९१ लाख ८८ हजार रुपये इतकी झाली आहे़.
कळंब तालुक्यातील हावरगाव (जि़उस्मानाबाद) येथे शुभकल्याण मल्टीस्टेटची मुख्य शाखा आहे़ जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटकात या मल्टीस्टेटच्या तब्बल १०३ शाखा आहेत़ शाखेतून मुदतीत पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी देण्यास सुरूवात केली होती़ यात पहिला गुन्हा उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता़ या गुन्ह्यात २१ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली असून, १ कोटी ४० लाख १३ हजार रूपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे़.
वाशी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आजवर ६ जणांनीच तक्रारी केल्या आहेत़ या सहा जणांचे ३४ लाख ३२ हजार ७२८ रूपये शुभकल्याणमध्ये अडकले आहेत़ तर कळंब येथील पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर ३२ जणांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे़ या ३२ जणांची तब्बल २ कोटी १७ लाख ४२ हजार ५३३ रूपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल आहेत़ तिन्ही गुन्ह्यात एकूण ५९ ठेवीदारांच्या तक्रारी असून, संबंधितांचे ३ कोटी ९१ लाख ८८ हजार २६१ रूपयांच्या ठेवी शुभ कल्याण मल्टीस्टेटमध्ये अडकल्या आहेत.
उस्मानाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेने शहर शाखेतील व्यवस्थापकाला अटक केली होती़ त्यांना जामीन मंजूर झाला आहे़ मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आपेटसह इतर संचालक फरार होते़ दरम्यान, आपेट बीड पोलिसांच्या हाती लागल्यानंतर उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासासाठी तो आपल्याही ताब्यात मिळावा, यासाठी हालचाली सुरु केल्याचे उपाधीक्षक अंजुम शेख यांनी सांगितले़.