इसिसच्या दहशतवाद्यांना रसद पुरवणारा अकीब नाचन ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 07:36 AM2023-08-06T07:36:29+5:302023-08-06T07:36:46+5:30

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाची भिवंडीत कारवाई 

Aqib Nachan, who provided logistics to ISIS terrorists, was arrested | इसिसच्या दहशतवाद्यांना रसद पुरवणारा अकीब नाचन ताब्यात

इसिसच्या दहशतवाद्यांना रसद पुरवणारा अकीब नाचन ताब्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पडघा : देशाच्या स्वातंत्र्यदिनी मोठा घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या आयसीसच्या पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांची सारी व्यवस्था पाहाणारा व रसद पुरविणारा अकीब नाचन याला राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) यांनी ताब्यात घेतले. पडघ्यालगतच्या बोरिवली गावामधून शनिवारी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास केलेल्या कारवाईत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

या आयसीसच्या दहशतवाद्यांची निवास व्यवस्था करण्यापासून त्यांना या कटकारस्थानाकरता रसद पुरविल्याच्या संशयावरून अकीब नाचनवर ही कारवाई केली गेली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने अकीबला अटक करून त्याच्यावर मोक्काखाली कारवाई केली होती. या प्रकरणात जानेवारी २०२३ मध्ये त्याला जामीन मिळाल्याने तो पुन्हा बोरिवलीत परतला होता. 
काही दिवसांपासून एनआयए मॉड्युल महाराष्ट्रात सक्रिय आहे. या मॉड्युलचा भाग म्हणून पडघ्यात ही छापेमारी केली. यापूर्वी पाच जणांना एनआयएने अटक केली आहे. त्यात मुंबईतून एक, पडघ्यातून दोन, पुण्यातून दोन अशा पाच दहशतवाद्यांचा समावेश आहे. 
पडघ्यातून अटक केलेले झुल्फिकार अली बरोडावाला आणि जुबेर खान हे दोघे पडघ्यात भाड्याने राहत होते. या दोघांना अकीबने आर्थिक मदत केल्याचा एनआयएचा दावा आहे. 

अकीब नाचन कोण आहे?

अकीब नाचन हा पडघ्यातील बांधकाम व्यावसायिक असून येथे त्याचा प्रशस्त बंगला आहे. २३ मार्च २०११ रोजी अकीबवर बोरिवली गावात  किरकोळ मारहाण व धमकी देण्याचा पहिला गुन्हा दाखल झाला होता. २५ जून २०१५ रोजी न्यायालयाने यातून त्याची निर्दोष सुटका केली. 

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) कायद्यानुसार भिवंडीतील निजामपुरा पोलिस ठाण्याने २९ ऑगस्ट २०१२ रोजी अकीबला अटक केली होती. सध्या तो या प्रकरणी जामिनावर आहे. अकीबला दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणास्तव गुजरात एटीएसने १५ मे २०२२ रोजी त्याला अटक केली होती. इसिसच्या अल सुफा या संघटनेशी त्याचा संबंध होता. १० जानेवारी २०२३ रोजी त्याला या प्रकरणी जामीन मिळाला.

एनआयए आणि एटीएस यांनी पुण्याच्या कोंढवा भागातून शोधून काढून उद्ध्वस्त केलेली मॉड्युल्स एकमेकांच्या संपर्कात होती, हे आता स्पष्ट झाले आहे. एनआयएने अटक केलेला झुल्फिकार अली बरोडावाला हा एटीएसने अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान व मोहम्मद युनुस साकी या दोघांना पैसे पुरवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी साकिब नाचन ठरला होता वादग्रस्त
साकिब नाचन हा एकेकाळी सिमी संघटनेशी संबंधित असल्यावरून वादग्रस्त ठरला होता. आजही साकिबचे येथे वास्तव्य आहे. नाचन कुटुंबाचे येथे राजकीय वर्चस्व असून दहशत आहे. त्यामुळे बोरिवली गावातील काही नागरिकांशी संपर्क साधला असता कुणीही उघडपणे प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील अकीबने बोरिवली गावात कोट्यवधी रुपये खर्च करून आलिशान बंगला कसा उभारला, याची चर्चा आहे. अकीबचे शिक्षण पुण्यात झाल्याची माहिती आहे.

Web Title: Aqib Nachan, who provided logistics to ISIS terrorists, was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.