अमली पदार्थांच्या विक्रीचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरले जातात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 09:00 PM2018-11-14T21:00:46+5:302018-11-14T21:01:21+5:30
एटीएसची कारवाई; २ किलो चरससह काश्मिरी तरूण जेरबंद
मुंबई - दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यात शीळ फाटा रोड येथे सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत अमली पदार्थ चरससह काश्मिरी तरूणाला अटक केली. त्याच्याकडून २ किलो चरस जप्त करण्यात आला. आरोपीला ठाण्यातील न्यायालयापुढे हजर केले असता त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या विक्रीचे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणार होते का? याबाबत एटीएस तपास करत आहेत.
ठाण्यात एक काश्मिरी तरूण अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने सोमवारी शिळफाटा रोड येथे सापळा रचला. त्यावेळी मोटरसायकलवरून एक संशयीत तरुण आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक किलो 800 ग्रॅम चरस पोलिसांना सापडले. आरोपीच्या चौकशीत तो जम्मू काश्मिर येथील अनंतनाग जिल्ह्यातील पाहेलगाम तहशीलमधील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार अमली पदार्थ तस्करी प्रतिबंधक कायद्याअन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.