सुपारी माफियांना दिल्ली, नोएडासह परप्रांतात आश्रय; आतापर्यंत 'सैय्या भये कोतवाल, अब डर काहे का'चा होता थाट
By नरेश डोंगरे | Published: December 4, 2022 08:14 PM2022-12-04T20:14:44+5:302022-12-04T20:15:49+5:30
Crime News : सुपारी माफियांच्या पंटर्सनी नागपुरातील काही दलालांकडून सेटिंगसाठी जोरदार धावपळ चालविली आहे.
नागपूर : सक्तवसुली संचालनालया (ईडी)च्या जोरदार कारवाईमुळे नागपुरातील सुपारी माफियांची दाणादाण उडाली आहे. आपली मानगुट शाबूत ठेवण्यासाठी सुपारी माफिया आपल्या दिल्ली, नोएडासह ठिकठिकाण्या आश्रयदात्यांकडे पळाले आहेत. दुसरीकडे सुपारी माफियांच्या पंटर्सनी नागपुरातील काही दलालांकडून सेटिंगसाठी जोरदार धावपळ चालविली आहे.
कॅप्टन उर्फ जसबीरसिंग छटवाल, आसिफ कलिवाला, प्रकाश गोयल, हिमांशू भद्रा, हेमंत कुमार यांच्यासोबत वेन्सानी, राजू अण्णा, अल्ताफ भोपाली, वसिम (भांजा)बावला, बंटी मोरानी, चारमिनार, संजय पाटना हे कोट्यवधींच्या सडक्या सुपारीचे काम अनेक वर्षांपासून करीत होते. लोकमतने यापूर्वी अनेकदा त्यांची नावे ठळकपणे प्रकाशित केली आहे. मात्र, स्थानिक भ्रष्ट अधिकारी आणि दलाल (सेटर)ची मजबूत साखळी सोबतीला असल्याने त्यांच्यावर फारशी कडक कारवाई होत नव्हती. त्याचमुळे सुपारी माफियाचा थाट 'सैय्या भये कोतवाल, अब डर काहे का' असा असायचा. तथापि, भक्कम पुरावे गोळा करून गुरुवारी ईडीने नागपुरात सुपारी माफियांवर छापेमारी केली. आता त्यांच्या पापाचा लेखाजोखा तपासला जात आहे.
कारवाईत उघड झालेल्या सुपारी माफियांच्या नावांमुळे लोकमतच्या वृत्तावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले, हे विशेष! दरम्यान, गेल्या वर्षी सीबीआयने दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यात नेटवर्क असलेल्या सुपारी व्यापाऱ्यांवर छापे मारले होते. नागपुरात तीन ठिकाणी छापे मारून कोट्यवधींच्या व्यापाराची कागदपत्रेही जप्त केली होती. त्यावेळी दिल्लीच्या व्यापाऱ्यांसाठी नागपुरातील व्यापाऱ्यांनी मोठी धावपळ करून येथील दलालांना हाताशी धरले होते. त्यांच्या माध्यमातून या कारवाईचा बोभाटा होऊ नये, यासाठीही प्रयत्न केले होते. आता याच (नागपुरातील) सुपारी माफियांवर ईडीने हात टाकल्याने त्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे यातील काही जण या धंद्यातील गब्बर (गॉडफादर)चा आश्रय मिळवण्यासाठी दिल्ली, नोएडा, काही जण मध्यप्रदेश, छत्तीसगड तर काही अन्य राज्यात पळून गेल्याची माहिती आहे. त्यांचे पंटर (दलाल) मात्र नागपुरातच सेंटिंगच्या नावाखाली दुसऱ्या दलालांकडे धावपळ करीत असल्याचेही वृत्त आहे.
माफियांसोबत ५०० जणांचे नेटवर्क
सुपारी माफियांचे जागोजागी अनेक पंटर आहेत. भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी, बोभाटा करणारे कुख्यात सेटर, भट्टीवाले तसेच दलाल असे सुमारे ५०० जणांचे सुपारी माफियांचे नागपुरात नेटवर्क आहे. यातील बहुतांश जण ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांचीही धावपळ सुरू आहे.