मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत वाद, चाॅपरच्या हल्ल्यात दोघे जखमी
By विजय.सैतवाल | Published: July 29, 2023 12:23 AM2023-07-29T00:23:37+5:302023-07-29T00:23:46+5:30
शिरसोली येथे रात्री पावणे अकरा वाजेची घटना
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: मोहरम सणानिमित्त काढण्यात आलेल्या सवारी मिरवणुकीमध्ये वाद होऊन दोन जणांवर चाॅपरने वार केल्याने ते जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शिरसोली प्र.न. येथे घडली.
मोहरम सणानिमित्त शुक्रवारी रात्री सवारी मिरवणूक काढण्यात आली होती. शिरसोली येथे ही मिरवणूक सुरू असताना समोर गर्दी वाढू लागली. त्यादरम्यान वाद उफाळला व सर्वजण गर्दीच्या दिशेने धावू लागले. यावेळी एका जणाने चाॅपरने वार केल्याने हेमंत मुरलीधर बारी (१७) व मयूर रवींद्र महाजन (२२) हे दोघे जण जखमी झाले.
या घटनेने परिसरात पळापळ सुरू झाली. पोलिस पाटील श्रीकृष्ण वराडे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर एक जखमी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यावेळी त्याच्यावर उपचार आवश्यक असल्याने त्याला पोलिसांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. यादरम्यान रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.
गावातील अगोदरच्याच वादातून घटना घडली असल्याचे उपनिरीक्षक पोटे यांनी सांगितले. गावात शांतता असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आली.