वाढदिवसाच्या केक डिझाईनवरून झालेली हाणामारी बेतली मित्राच्या जीवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:43 PM2020-01-06T18:43:18+5:302020-01-06T18:45:35+5:30
उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
चेन्नई - नववर्षाचा जल्लोष साजरा करत असताना तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडला. चेन्नई येथे वाढदिवसाच्या केकवरून पाच लोकांमध्ये झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली आहे. बेकरीमध्येच एकाची हत्या केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 31 डिसेंबरला पुंथॉप कॉलनीतील रहिवासी असलेल्या कुमार (30) आणि पुष्पराजन (30) यांना टोळक्याने बेदम मारहाण केली होती.
वाढदिवसाच्या केकची डिलेव्हरी करण्यास उशीर झाल्यामुळे बकेरीतील कर्मचाऱ्यांसोबत या दोघांचा वादविवाद सुरु झाला. 31 डिसेंबर रोजी कुमारचा वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी बेकरीमध्ये केकची ऑर्डर दिली होती. मात्र, केकच्या डिलेव्हरीला उशीरा झाल्यामुळे कुमार आणि पुष्पराजन यांनी बेकरी कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त केला. तसेच कुमारला केकची डिझाईन आवडली नसल्याने त्याने त्याबद्दलही राग व्यक्त केला होता. त्यानंतर कुमार आणि पुष्पराजन दुचाकीवरून घरी परतत असताना इरियापिलईकुप्पमजवळ दहा जणांच्या टोळक्याने त्या दोघांना गाठले आणि रस्त्यात थांबवले. टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
या हल्ल्यात दोघेही मात्र गंभीर जखमी झाले. त्यांना पोन्नेरी या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुष्पराजची प्रकृती चिंताजनक असल्याने गव्हर्नमेंट स्टेनली रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान पुष्पराजचा मृत्यू झाला. याप्रकरणी कत्तुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली भरत (24), उमा भारत (21), प्रताप (18), अजित (23) आणि स्टालिन (23) यांना अटक केली आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी हल्लेखोर बेकरी कर्मचाऱ्याचे मित्र होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.