कारचा हॉर्न वाजविण्यावरून झालेला वाद पोहोचला शेगला; विटा, दगडाने ठेचून युवकाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 05:41 PM2022-07-19T17:41:39+5:302022-07-19T17:42:30+5:30
Murder Case : आधी हाणामारी आणि त्यानंतर विटा आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजधानी दिल्लीत कारचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा विटा आणि दगड मारल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आधी हाणामारी आणि त्यानंतर विटा आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
16 जुलै रोजी दुपारी 2:53 वाजता साकेत मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 2 जवळ एक तरुण पडून असून त्याच्या तोंडातून रक्त येत असल्याचा पोलिसांना फोन आला. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी पीडितेला सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. 17 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पीडित रोहितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तपासादरम्यान, पीडित रोहितचा मित्र राहुल याने दिल्ली पोलिसांना सांगितले की, 16 जुलै रोजी रात्री 2.30 च्या सुमारास रोहित आणि इतर मित्र साकेत मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 2 जवळ कार पार्क करत होते. तेथे उपस्थित असलेल्या काही मुलांशी त्याचे भांडण झाले. मारामारीदरम्यान त्या मुलांनी रोहितवर विटा आणि दगडाने प्रहार केला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळाच्या आजूबाजूच्या 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन करण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी प्रियांशू नावाच्या आरोपीला पकडले. चौकशीदरम्यान प्रियांशूने पोलिसांना सांगितले, घटनेच्या वेळी तो त्याच्या पाच मित्रांसह उभा होता, तेव्हा कारमध्ये 4 मुले आली आणि त्यांना ते उभे होते तिथे कार पार्क करायची होती. तो न हलल्याने रोहितने गाडीचा हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली, त्यावरून मारामारी सुरू झाली आणि त्यानंतर दोन मुलांनी रोहितच्या डोक्यावर दगड आणि विटांनी वार केले आणि ते फरार झाले. सध्या पोलीस उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत.