नॉन व्हेजवरून वाद, तोंडावर दगड मारून मजुराचा खून

By दयानंद पाईकराव | Published: June 30, 2024 06:07 PM2024-06-30T18:07:44+5:302024-06-30T18:08:01+5:30

तिघांना अटक : सोनेगाव ठाण्याच्या हद्दीतील घटना

Argument over non-veg, laborer killed by pelting stone on face | नॉन व्हेजवरून वाद, तोंडावर दगड मारून मजुराचा खून

नॉन व्हेजवरून वाद, तोंडावर दगड मारून मजुराचा खून

नागपूर : बाहेरील राज्यातून आलेल्या मजुरांमध्ये मांस शिजविण्यावरून वाद झाला. त्यात तीन मजुरांनी एकाच्या तोंडावर दगड मारल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी २० जूनला रात्री १ वाजताच्या सुमारास घडली असून पोलिसांनी खून करणाऱ्या तीन मजुरांना अटक केली आहे.

मृतक लम्बु उर्फ शिवम (३०, ह. मु. चौरसिया लेबर झोपडपट्टी डीपीएस शाळेमागे मिहान) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. तर जितेंद्र बाळाराम रावटे (३५, रा. विटाळ, ता. राजनांदगाव छत्तीसगड), अखिलेश धोंडुलाल सहारे (२८, रा. अट्टाकोड शिवनी ता. जि. बालाघाट मध्यप्रदेश) व दिपक सर्वजण रा. चौरसिया लेबर झोपडपट्टी डीपीएस शाळेमागे मिहान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिहान सिटीजवळ सुर्या रेसिडेन्सीचे बांधकाम सुरु आहे. या कामासाठी बाहेरील राज्यातून मजुर आले आहेत. यात मृतक लम्बु आणि तीन आरोपी मजुरांचा मांस शिजविण्यावरून वाद झाला. आरोपींनी लम्बुच्या तोंडावर दगड फेकून मारला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मृतक लम्बु हा बाहेरील राज्यातील असल्यामुळे त्याची पूर्ण ओळख पटलेली नाही. त्याच्या डाव्या दंडावर हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे. तर डाव्या हाताच्या मनगटापासून कोपरापर्यंत ‘शामगिरी गोस्वामी’ असे नाव गोंदलेले आहे. या प्रकरणी सोनेगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन मगर, सहायक पोलिस निरीक्षक अचल कपुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सोनेगाव पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Argument over non-veg, laborer killed by pelting stone on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.