दारू पिण्यावरून वाद ; पाईपने गळा आवळून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 01:30 PM2023-09-24T13:30:53+5:302023-09-24T13:31:48+5:30
यात राजकुमार होनमाने व अन्य एकाने अंदाजे ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीचा प्लॉस्टिकच्या पाईपने गळा आवळून खून केला.
हिंगोली: दारू पिण्याच्या कारणावरून तिघांत वाद झाला. त्यानंतर हाणामारी होऊन एका अंदाजे ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीचा प्लास्टिकच्या पाईपने गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना हिंगोली शहरातील डीवायएसपी कार्यालय (ग्रामीण) परिसरात शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयताची ओळख पटली नसून त्याच्या हातावर शोभा हरिदास दशरथ असे गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरून मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.
या बाबत ज्ञानेश्वर विठ्ठल सानप (रा. महादेववाडी हिंगोली) यांच्या फिर्यादीवरून राजकुमार परसराम होनमाने (रा. पोतरा ता. कळमनुरी) व अन्य एकावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. शनिवारी रात्री राजकुमार होनमाने व अन्य दोघेजण गांधी चौकातील दारू अड्ड्यावर दारू पित होते. या वेळी दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ते वाद करीत बसस्थानकाकडे गेले. तेथून परत गांधी चौकाकडे येत असताना डीवायएसपी कार्यालय (ग्रामीण) व पेट्रोल पंप परिसरात पुन्हा त्यांच्यात वाद झाला. वाद करीत अंधारात गेले. तेथे त्यांच्यात हाणामारी झाली.
यात राजकुमार होनमाने व अन्य एकाने अंदाजे ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीचा प्लॉस्टिकच्या पाईपने गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रेत डीवायएसपी कार्यालयाच्या बाजूला फेकून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर, पोलिस उपनिरीक्षक के.एम. आगलावे, पवार, पोलिस अंमलदार संजय मार्के, सतीश जाधव, सचीन मस्के, अमजद शेख, भगत, नागरे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे.
मयताची ओखळ पटवण्याचा प्रयत्न
दरम्यान, पोलिसांनी मृतदेह जिल्हा रूग्णालयात दाखल केला. या वेळी मयताच्या हातावर पाहणी केली असता त्यावर शोभा हरिदास दशरथ असे गोदलेले आहे. यावरून पोलिस मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.