अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
By राजकुमार जोंधळे | Published: December 2, 2024 08:52 PM2024-12-02T20:52:46+5:302024-12-02T20:54:00+5:30
एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर चाैघांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार जाेंधळे, लातूर: संगणकावर बनावट पावत्या तयार करून लातुरातील अरिहंत व्हेज ऑइल्स प्रा. लि. कंपनीला तब्बल ५ काेटी ७८ लाख ५१ हजार ७० हजारांना गंडविल्याची घटना घडली. ही फसवणूक जानेवारी २०२० ते ऑक्टाेबर २०२४ या काळात केली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर चाैघांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी उत्कर्ष अशोकराव संगवे (वय ५५, रा. परशुराम पार्क, हरंगुळ बु. रोड, लातूर) यांनी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विशाल राजेंद्र वजरंगे (वय २७), वैभव राजेंद्र बजरंगे (वय २९, दोघे रा. सोना नगर लातूर), विजय झोडगे, राजकुमार जाधव याच्यासह इतरांनी संगनमत करून वजनामध्ये फेरफार करुन, साेयाबीन परीक्षण गुणवत्तेत बदल करत त्यानुसार संगणकावर बनावट पावत्या तयार केल्या. या बनावट पावत्याच्या माध्यमातून साेयाबीन पुरवठादार ट्रेडिंग कंपनीचे मालक, त्यांना पैसे पाठविणारे व्यक्ती, वाहन मालक-चालक आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्या व्यक्तींनी कट रचून लातुरातील अतिरिक्त एमआयडिसी, चिंचोलीराववाडी परिसरात असलेल्या अरिहंत व्हेजऑइल्स प्रा. लि. या कंपनीला ५ काेटी ७८ लाख ५१ हजार ७० हजार रुपयांना गंडा घालत फसवणूक केली. हा गुन्हा जानेवारी २०२० ते ३१ ऑक्टाेबर २०२४ या काळात घडला आहे.
याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर विशाल वजरंगे, वैभव बजरंगे, विजय झोडगे, राजकुमार जाधव याच्यासह इतरांविराेधात गुरनं ८४८ / २०२४, कलम ३१६ (४), ३१८ (क), ३३६ (३), ३३८, ३३९, ३४०, ३४४, ६१ (२) बीएनएस २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस निरीक्षक सुधाकर देडे हे करीत आहेत.