लक्ष्मीपूजनालाच दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा; रात्रभर चोरट्यांचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 11:10 AM2022-10-24T11:10:22+5:302022-10-24T11:12:05+5:30
अज्ञात दरोडेखोरांनी चाकू, कुऱ्हाडीचा व लाठ्या काठ्याचा वापर करत दोन महिलांसह तीन ते चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
सचिन सांगळे
नांदूरशिंगोटे, जि नाशिक : सिन्नर तालुक्यातील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे येथे रविवारी (दि.23) मध्यरात्री लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकत सोन्यासह लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना घडली. सात ते आठ दरोडेखोऱ्यांनी नांदूरशिंगोटे रात्रभर धुमाकूळ घातल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी चाकू, कुऱ्हाडीचा व लाठ्या काठ्याचा वापर करत दोन महिलांसह तीन ते चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी पथके तयार करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी पाच घरांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन बंगल्यात त्यांनी धाडसी घरफोडी केली. अडीच तास दरोडेखोरांनी मोठी दहशत निर्माण केली होती. एका बंगल्यात चोरीचा अयशस्वी प्रयत्न होत असताना बंगल्यात प्रवेश करताना दरोडेखोर सीसीटीव्हीत दिसून आले आहेत. दरम्यान दरोडेखोर व शेळके परिवारातील सदस्य यांच्या झटापटी घडल्या.
येथील जुन्या चासरोड लगत बांधकाम व्यावसायिक संतोष गंगाधर कांगणे यांचा कैलास स्मृती नावाचा बंगला आहेत. सदरच्या बंगल्यला दरोडेखोरांनी टार्गेट करत दहा ते बारा तोळे सोने तसेच पावणेतीन लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लांबविली. दरोडेखोरांनी वीस ते पंचवीस मिनिटे कांगणे यांच्या घरात धुमाकूळ घालत चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी चाकू व हत्याराचा दाख दाखविल्याने त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार न करता घरातील ऐवज चोरुन नेला. घरातील लहान मुलांनाही लक्ष केले. त्यानतंर दरोडेखोरांनी नाशिक - पुणे हायवे लगत अवघ्या एक हजार फुटावर अंतरावर असलेल्या वाळके वस्तीवरील बंगल्यला लक्ष केले. रमेश लक्ष्मण शेळके यांनी नुकताच दोन दिवसापूर्वी नवीन बंगल्यात प्रवेश करुन राहण्यासाठी आले होते. दरोडेखोरांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत शेळके यांच्या मातोश्री इंदुबाई लक्ष्मण शेळके यांना धमकावत कानातील सोन्याचे काप ओरबाडून नेले. तसेच त्यांना मारहाण केली तसेच शेळके यांच्या बेडरुमचा दरवाजा बंद करुन घेतला. मात्र त्यांची मुलगी आरोषी हिने दरवाजा उघडल्याने बाहेर येताच त्यांच्यात झटापट झाली. यावेळी सहा ते सात दरोडेखोरांचा शेळके परिवाराने प्रतिकार केल्याने दोहेजण जखमी झाले. दरम्यान पोलीस अधीक्षक शहाजी उमप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट देत पोलीसांना तपासाच्या सूचना दिल्या.