वाड्यात सोमवारी पहाटे सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:50 PM2019-08-26T23:50:06+5:302019-08-26T23:50:34+5:30
रिव्हॉल्व्हरच्या धाकावर लुटले : रोख ८० हजार, ८ तोळे दागिने लंपास
वाडा : तालुक्यातील देवघर (भोईर पाडा) येथील अनिल मुकुंद पाटील यांच्या रहात्या घरी सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी रिव्हॉल्वर आणि चॉपरचा धाक दाखवून सुमारे ८० हजार रु पये रोख आणि ८ तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला.
अनिल पाटील हे शेती आणि वीट भट्टीचा व्यवसाय करतात. रविवारी रात्री आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपले असता सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास तोंडाला मास्क आणि हॅण्डग्लोव्ह्ज घातलेल्या, रिव्हॉल्वर, चॉपरसारखे शस्त्र हातात असलेल्या तीन दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. झोपेत असतानाच शस्त्राचा धाक दाखवून अनिल पाटील आणि त्यांच्या पत्नीला उठविण्यात आले. त्यांच्या अंगावर असलेल्या सोन्याच्या चेन, गरसोळ हिसकावून घेत अजून पैसे कुठे ठेवले आहेत ते विचारले. त्यांनी काहीच नाही असे सांगितल्यावर दरोडेखोरांनी अनिल पाटील, पत्नी अश्विनी आणि मुलगा प्रतीक यांचे हातपाय बांधले तसेच तोंडाला पट्टी बांधली. सर्व घरात शोधाशोध केल्यावर दरोडेखोरांना पाटील यांनी विटभट्टीवरील मजुरांसाठी ठेवलेली ८० हजार रु पयांची रोकड शोकेसमध्ये सापडली. त्यानंतर सर्व ऐवज व रोकड घेऊन ते पसार झाले.
याबाबत वाडा पोलिस स्टेशनमध्ये भादंविस कलम ३९२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वाडा पोलिस करीत आहेत.