संरक्षण खात्यात खळबळ माजली; १६ लाख घेत युवकाला पाकिस्तान बॉर्डरवर नोकरीला ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:31 PM2022-11-22T16:31:17+5:302022-11-22T16:33:03+5:30
गाझियाबाद जिल्ह्याचा रहिवासी असलेला मनोज मुझफ्फरनगरच्या कंकराला येथील रहिवासी राहुलच्या संपर्कात आला.
मेरठ - आर्मी इंटेलिजेंसने लष्करात नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. इतकेच नाही तर एका युवकाला लष्कराच्या छावणीत तब्बल ४ महिने ड्युटीला ठेवल्याचं उघड झाले आहे. लष्करी जवानाने आपल्या साथीदारासह दोन भावांकडून नोकरीचं आमिष दाखवून १६ लाख रुपये लाटले. एका भावाला चार महिने कॅन्ट परिसरात ठेवून त्याला फालोअर म्हणून नोकरीही मिळवून दिली. दर महिन्याला पगाराच्या नावावर त्याच्या खात्यात १२ हजार जमा होत होते. पीडितेच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी आर्मी मॅन राहुलला पकडले तर त्याचा साथीदार बिट्टू याला सोमवारी रात्री उशिरा मेरठ येथून अटक करण्यात आली. या घटनेमुळे संरक्षण खात्यात मोठी खळबळ माजली आहे.
गाझियाबाद जिल्ह्याचा रहिवासी असलेला मनोज मुझफ्फरनगरच्या कंकराला येथील रहिवासी राहुलच्या संपर्कात आला. राहुलने अलीकडेच दौराला येथील कृष्णा कॉलनीत दोन वर्षांपूर्वी एक घर विकत घेतले असून तो त्याची आई आणि भाऊ वहिणीसोबत राहतो. तो टेरिटोरियल आर्मीमध्ये शिपाई आहे. राहुलने त्याचा दौराला येथील मित्र बिट्टूसोबत मनोजला सैन्यात नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवले. बिट्टू हा कर्नल असल्याचे मनोजला सांगण्यात आले.
नोकरी लावण्याच्या नावाखाली १६ लाख घेतले
मनोज आणि त्याच्या भावाला नोकरी देण्यासाठी १६ लाख रुपये निश्चित करण्यात आले होते. दहा लाख रोख दिले आणि मनोजने सहा लाख राहुलच्या खात्यात टाकले. यानंतर राहुलने मनोजला टेरिटोरियल आर्मी ऑफिसमध्ये सोबत ठेवण्यास सुरुवात केली. राहुलने मनोजला बाजारातून विकत घेतलेला लष्कराचा गणवेश आणि ओळखपत्र दिले आणि त्याच्यासोबत पठाणकोट कार्यालयात त्याला फालोअर म्हणून ठेवले. मनोजने तिथे जेवण बनवायला सुरुवात केली. यासोबतच कधी-कधी लष्कराच्या शस्त्रांसह सीमेवर ड्युटीही करायला गेला.
कर्नलचा गणवेश घालून व्हिडिओ कॉलवर बोलायचे
सोमवारी रात्री उशिरा अटक झालेला बिट्टू कर्नलचा गणवेश घालून मनोजशी व्हिडिओ कॉलवर बोलत असे. कर्नल सध्या परदेशात आहेत, तेथून परतल्यानंतर बदली करतील असं मनोजला सांगण्यात आले. मग त्याला फालोअरचं काम करावे लागणार नाही. अचानक मनोजला राहुलवर संशय आला आणि त्याने कसं तरी आर्मी इंटेलिजन्सशी संपर्क साधला. आर्मी इंटेलिजन्स या लोकांवर जवळपास एक महिन्यापासून नजर ठेवली. मेरठला पोहोचल्यावर त्यांनी सर्वप्रथम राहुलला मोदीपुरममध्ये अटक केली. त्यानंतर राहुलचा भाऊ अंकित याला त्याच्या कृष्णानगरातील घरातून अटक करण्यात आली. दोघांची चौकशी केल्यानंतर बिट्टूला कंकरखेडा परिसरातून अटक करण्यात आली.
मेरठ आर्मी इंटेलिजन्सने लखनौपासून दिल्लीपर्यंत संरक्षण मंत्रालयाला या प्रकरणाची माहिती देताच. सीमेवर एका सामान्य नागरिकाने शस्त्रास्त्रांसह कर्तव्य बजावले तेव्हा एकच खळबळ उडाली. आता आर्मी इंटेलिजन्स प्रत्येक लिंक जोडून त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांनी त्यांना लष्कराचा गणवेश विकला, बनावट कागदपत्रे बनवली, लष्कराचे शिक्के मिळवून लष्कराचे अधिकारी बनवले, आता पोलीस प्रशासनाशी बोलून त्यांनाही अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.