द्रमुक नेत्यासह नऊ जणांची सैन्यातील जवानाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 06:48 PM2023-02-15T18:48:22+5:302023-02-15T18:48:54+5:30
तमिळनाडुच्या कृष्णागिरीमध्ये शुल्लक कारणावरुन भारतीय सैन्यातील जवानाला बेदम मारहाण करण्यात आली.
Indian Army : भारतीयांच्या मनात भारतीय सैन्यातील जवानांबद्दल खूप आदर आहे. पण अनेकदा अशा बातम्या येतात, ज्यात जवानांना अतिशय वाईट वागणूक दिल्याचे आपण ऐकतो. अशा लोकांबद्दल आपल्या मनात तीव्र राग येतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे, ज्यात काही लोकांनी मिळून एका जवानाचा जीव घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील कृष्णगिरीत ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 33 वर्षीय लष्करी जवानाला बेदम मारहाण करण्यात आली. पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्याच्या वादातून द्रमुक नगरसेवक आणि इतरांनी जवानाला बेदम मारहाण केली. 8 फेब्रुवारीला जवान प्रभाकरन आणि द्रमुकचे नगरसेवक चिन्नासामी यांच्यात पोचमपल्ली येथील टाकीजवळ कपडे धुण्यावरून वाद झाला. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्याच रात्री चिन्नासामी आणि इतर नऊ जणांनी प्रभाकरन आणि त्याचा भाऊ प्रभू यांच्यावर हल्ला केला.
टोळक्याने प्रभाकरन यांना एवढी मारहाण केली की, त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.