फौजी, पत्नी अन् 'ती'...उघड्या दरवाजाच्या खोलीचं रहस्य; रात्री असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 11:04 IST2024-07-21T11:03:12+5:302024-07-21T11:04:07+5:30
एका विवाहित महिलेच्या मृत्यूनं कैमूरमध्ये खळबळ, आर्मी जवानाच्या पत्नीची हत्या की आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू

फौजी, पत्नी अन् 'ती'...उघड्या दरवाजाच्या खोलीचं रहस्य; रात्री असं काय घडलं?
कैमूर - बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील मोहनिया पोलिसांना शनिवारी एक कॉल आला अन् तातडीने पोलिसांचे पथक वार्ड नंबर १३ परिसरात पोहचलं. तिथे पोहचताच पोलिसांना एका घराबाहेर लोकांची गर्दी दिसली. गर्दीतून वाट काढत पोलीस घराजवळ पोहचली तेव्हा तिथे दरवाजा उघडाच होता. पंख्याला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. महिलेचा मृत्यू झाला होता. मृत महिला ३० वर्षाची असून तिचं नाव मधू असं होतं.
गळफास घेत जीव देणाऱ्या महिलेच्या पतीचं नाव अजय कुमार यादव होतं. अजय आर्मीत तैनात होता. त्याचे कुटुंब कैमूर जिल्ह्यातील मोहनिया इथं भाड्याच्या घरात राहत होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले होते. डीसीपी दिलीप कुमार सिंह म्हणाले की, स्थानिकांनी पोलिसांना या घटनेबाबत कळवलं. एक विवाहित महिला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होती. मधू कुमारी असं या मृत महिलेचं नाव होतं. प्रथमदर्शनी या महिलेने आत्महत्या केल्याचं दिसतं असं पोलिसांनी सांगितले.
सकाळपर्यंत सर्वकाही ठीक होतं...
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपर्यंत मधूसोबत पती अजय, भाऊ आणि काका होते. त्यानंतर पती आणि भाऊ बाहेर गेले होते. पती सुट्टीवर आदल्यादिवशीच आला होता. मुलांना शाळेत पाठवलं होतं. जेव्हा मुलं शाळेतून घरी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. घरचा दरवाजा उघडाच होता त्यामुळे पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
फौजीवर आरोप
या घटनेनंतर मधूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचा भाऊ शशिकांत यादव याने मधूच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मधूचा फौजी पती अजय यादव याचे एका अन्य मुलीसोबत अनैतिक संबंध होते. ती मुलगी अजयच्या शेजारील गावात राहायची. याबाबत मधुला कळलं होतं. तिने या गोष्टीचा विरोध केला. या गोष्टीवर पतीसोबत भांडण व्हायचं. अजय नेहमी मधूचा छळ करायचा. मधूची हत्या तिच्या पतीनेच केली आहे त्यामुळे तो फरार असल्याचं मधुच्या कुटुंबानं म्हटलं आहे.