मास्क लावला नाही, म्हणून लष्कराच्या जवानाला बेदम मारहाण; तीन पोलीस कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 12:13 PM2021-09-02T12:13:06+5:302021-09-02T12:18:26+5:30
चत्रा येथे मस्क चेकिंग मोहिमेदरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर असलेल्या पवन कुमार यादव यांना बेदम मारहाण केली.
चतरा - मास्क लावले नाही, म्हणून भारतीय लष्कराच्या एका जवानाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी झारखंडमधील चतरा जिल्ह्यात घडली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चत्राच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या घटनेच्या अहवालानंतर, ही कारवाई करण्यात आली. पवन कुमार यादव असे या जवानाचे नाव आहे. (Army Soldier brutally thrashed accused three police personnel suspended in chatra Jharkhand)
चत्रा येथे मस्क चेकिंग मोहिमेदरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीवर असलेल्या पवन कुमार यादव यांना बेदम मारहाण केली. मयूरखंड पोलीस ठाणे परिसरातील ही घटना घडली. येथील आरा-भुसाही गावातील रहिवासी पवनकुमार यादव आपल्या दुचाकीवर तेथे गेले होते. त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवले. त्याच्या दुचाकीची चावी पोलीस हवालदार संजय बहादूर राणा यांनी काढली. पवन कुमार यांनी बहादूर राणा यांना विरोध केला. यावर पोलिस कर्मचाऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. व्हिडिओत दिसत आहे, की पवन यांना मारहाण करणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच मास्क लावलेला नव्हता.
यावेळी स्थानिक लोकांनी पोलिसांना विरोध केला. यानंतर जवानाला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. एसपी राकेश रंजन यांनी या प्रकरणाची दखल घेत, डीएसपी मुख्यालय केदार राम यांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. स्थानिक खासदार सुनील कुमार सिंह यांनीही रंजन यांच्याशी बोलून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर एसपी राकेश रंजन यांनी तत्काळ कारवाई करत, संबंधित तीन आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.