तब्बल २८.९३ कोटींचा ऐवज वर्षभरात लंपास, चोरीचा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 02:56 AM2020-01-22T02:56:04+5:302020-01-22T02:56:46+5:30
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल २८ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून वर्षभरात चोरट्यांनी तब्बल २८ कोटी ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र, त्यापैकी अवघा ३२ टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. घडलेले गुन्हे उघड केल्यानंतरही मुद्देमाल परत मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने वर्षभरातील आकडेवारीवरून दिसून येत आहे.
शहरात घडणाऱ्या एकूण गुन्ह्यांमध्ये मालमत्तेशी संबंधित गुन्हे सर्वाधिक आहेत. एकूण गुन्ह्यांच्या ४० टक्के गुन्हे मालमत्ता चोरीसंबंधी आहेत. त्यामध्ये घरफोडी, वाहनचोरी, सोनसाखळीचोरी, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हे घडल्यानंतर अनेकदा पोलिसांकडून शीघ्र गतीने तपास करून गुन्ह्याची उकल केली जाते; परंतु आरोपी पकडल्यानंतरही चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी अत्यल्प मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागतो. त्यामुळे गुन्हेगारांकडून चोरीचा मुद्देमाल परत मिळवण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान असते. अनेकदा ते आव्हान स्वीकारत पोलिसांकडून अधिकाधिक मुद्देमाल जप्तीचा प्रयत्नही होतो. त्यानंतरही अपेक्षित मुद्देमाल हाती लागत नसल्याने तक्रारदाराचा हिरमोड झालेला असतो. त्यांची ही नाराजी अनेकदा उघडही झाल्याचे पोलिसांकडून मुद्देमाल परत देतेवेळी पाहायला मिळते.
गतवर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ६,८९५ गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये २,२६० गुन्हे मालमत्तेशी संबंधित असून त्यापैकी ८६१ गुन्हे उघडकीस आले आहेत. तीन वर्षांच्या तुलनेत मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा आलेख वाढल्याचे दिसून येत आहे. गतवर्षात तब्बल २८ कोटी ९३ लाख १४ हजार १३२ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. मात्र, त्यापैकी अवघा आठ कोटी १८ लाख ५० हजार ९७४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१८ मध्ये मालमत्तांचे एकूण २,२८० गुन्हे घडले होते. त्यामध्ये २६ कोटी ५७ लाख ३७ हजार ३६० रुपये किमतीच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यापैकी सात कोटी ९६ लाख १३ हजार ४२९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या दोन वर्षांच्या तुलनेत गतवर्षात २० गुन्ह्यांनी घट झाली आहे, तसेच मुद्देमाल जप्तीच्या प्रमाणातही दोन टक्क्याने वाढले आहे. मुद्देमाल जप्तीचे हे प्रमाण वाढावे, त्याकरिता पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणात माहिरत मिळवण्याची गरज आहे.
कारवाईनंतरही चांदी
घडलेल्या गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केल्यानंतरही त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल मिळवण्यात अपेक्षित यश येत नाहीये, त्यामुळे गुन्ह्यात गेलेल्या एकूण मुद्देमालापैकी अत्यल्प मुद्देमाल परत मिळाल्यानंतरही तक्रारदाराकडून फारसे समाधान व्यक्त केले जात नाहीये. तर एखाद्या गुन्ह्यात कारवाई झाल्यानंतरही पोलिसांपुढे बोलते न झाल्याने लपवलेल्या ऐवजामुळे संबंधित चोरट्याची चांदी होत असल्याचे दिसून येत आहे.
३८ कोटींचा मुद्देमाल चोरट्यांच्या घशात
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दोन वर्षात मालमत्तेचे ४,५४० गुन्हे घडले आहेत. त्यापैकी अवघे १,८३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये १७ कोटी १४ लाख ६४ हजार ४०३ रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आला आहे; परंतु दोन वर्षांत लंपास झालेल्या सुमारे ५५ कोटी ५० लाख रुपये किमतीच्या मुद्देमालाच्या तुलनेत जप्तीचा ऐवज कमी आहे. त्यामुळे उर्वरित ३८ कोटी ३५ लाख ८७ हजार ८९ रुपये किमतीचा मुद्देमाल तपासात पोलिसांच्या हाती न लागल्याने चोरट्यांनी तो फस्त केल्याचे दिसून येत आहे.