आजीच्या इच्छेखातर अल्पवयीन मुलीचा थाटला विवाह अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 09:38 PM2020-02-13T21:38:49+5:302020-02-13T21:42:17+5:30
त्या मैत्रिणीने एका महिला समाजसेविकेशी संपर्क साधत सर्व प्रकार सांगितला.
कल्याण - आजारी आजीच्या इच्छेखातर एका कुटुंबाने आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याची घाई केली. मात्र, एका महिला समाजसेविकेला याबाबतची माहिती मिळताच तिने कोळसेवाडी पोलिसांना सदरची बाब सांगताच मुलीचा होणारा विवाह कुटुंबियांनी रद्द केला.
पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात हे कुटुंबिय राहतात. कुटुंबातील १७ वर्षीय मुलीचे लग्न आजारी आजीला जिवंत असेपर्यंत बघायचे होते. त्यामुळे, तिच्या कुटुंबियांनी तिला स्थळ बघायला सुरुवात करत तिचा साखरपुडा देखील उरकला. तिचे लग्न ३ मार्चला लग्न नाशिक येथील सिन्नर येथे होणार होते. मात्र, मुलीला लग्न करायचे नसल्याने तिने आपल्या मैत्रिणीकडे आपला शाळेचा दाखला आणि लग्नपत्रिका पोहचवली. त्या मैत्रिणीने एका महिला समाजसेविकेशी संपर्क साधत सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर, पोलिसांनी सर्व सत्यता पडताळून मुलीच्या आईवडिलांना संपर्क साधला. मुलीच्या आजीच्या आजारपणामुळे मुलीचे लग्न लावत होतो अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली. मात्र, आता आम्ही हे लग्न रद्द करत असल्याचेही पोलिसांना लेखी दिले.